चंदन मोटघरेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी नगरपंचायतच्या उर्वरित चार प्रभागांसाठी प्रभाग क्रं. ५, १०, ११, १७ मध्ये निवडणूक होत आहे. चारही प्रभाग सर्वसाधारणसाठी जाहीर झाल्याने येथे इच्छुकांची कमालीची चुरस आहे. चारपैकी दोन प्रभाग महिला राखीव आरक्षित असल्याने येथे इच्छुक ‘श्री’ आता ‘सौ’साठी फिल्डिंग लावली आहे. पहिल्या टप्प्यातील १३ प्रभागांतून माघार घेतलेल्या काही उमेदवारांचाही या प्रभागांवर डोळा असून, त्यांनीही येथे अतिक्रमणाची तयारी केली आहे.लाखनी नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. ओबीसी आरक्षण स्थगितीनंतर संबंधित चार प्रभाग स्थगित ठेवून उर्वरित १३ प्रभागांत मतदान पार पडले. ओबीसी चार प्रभाग सर्वसाधारणसाठी जाहीर झाले असून, त्यात दोन ठिकाणी महिला आरक्षण आहे. प्रभाग ५ व १७ सर्वसाधारण पुरुषांसाठी आणि प्रभाग १० व ११ हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहेत. सक्षम उमेदवार असलेल्या या प्रभागात तीनही राजकीय पक्षांच्या गटांना निवडून येण्याची खात्री असल्याने येथे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. प्रभाग ५ व १७ मध्ये तुलनात्मक इच्छुकांची भाऊगर्दी आहे. प्रभाग १० व १२ मध्ये उमेदवारी स्थान मिळाले नाही त्यांनी आपल्या ‘सौ’साठी कमालीची फिल्डिंग लावली आहे. यावेळी येथे बंडखोरीला उधाण येण्याची शक्यता असल्याने याला वेळीच आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्यक आहेत. सर्वाधिक इच्छुकांची संख्या नेते व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या दृष्टीने येथे सार्वत्रिक डोकेदुखी आहे.मूळच्या स्थानिक उमेदवारांसह पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत काहींना माघार घ्यावी लागली आता ती मंडळीही या प्रभागात अतिक्रमणाच्या तयारीत आहेत. मुळातच या चारही प्रभागात तीनही राजकीय पक्षांची ताकद समसमान आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप गटाकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या वाढली आहे. अतिक्रमण थोपविण्यात अपयश आले तर मात्र विरोधकांना मतविभागणीतून लॉटरीची शक्यताही नाकारता येणार नाही.
इच्छुक, नाराज, बंडखोरांवर विरोधकांचा डोळा- राजकीय पक्षांच्या गटाचे इच्छुक, नाराज, बंडखोरांवर विरोधक डोळा ठेवून आहेत. त्यानुसार त्यांची उमेदवार निवड सुरू आहे. आज नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, मतदारांना कोण कोणत्या पक्षाकडून उमेदवार राहणार व कोणता उमेदवार निवडून येणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.