इंद्रपाल कटकवार भंडारासराफा बाजारात दररोज होणारी कोट्यवधीची उलाढाल बेमुदत संपामुळे ठप्प झाली आहे. व्यापाऱ्यांना कोट्यवधींचे नुकनास सहन करावे लागत आहे. मात्र, या संपाचा सर्वाधिक फटका सुवर्ण कारागिरांना बसला आहे. सराफा बंदमुळे कारागिरांचा रोजगार पूर्णपणे बुडाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हा बेमुदत संप कधी संपणार, असा प्रश्न कारागिरांसह त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावत आहे. सोन्यावरील उत्पादन शुल्कात एक टक्का आणि अबकारी करात झालेल्या वाढीमुळे सराफा व्यावसायिकांवर कराचा बोझा वाढला आहे. शासनाने वाढीव कर मागे घ्यावा, या मागणीसाठी देशभरातील सराफा व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामध्ये भंडारा जिल्ह्यासह शहरातील सराफा व्यावसियाकांचाही सहभाग आहे. जिल्ह्यात जवळपास ४५० सराफा दुकानदार असून भंडारा शहरात ११० दुकाने आहेत. भंडारा जिल्ह्यात जवळपास तीन हजार पेक्षा जास्त सुवर्णकारागीर असून ते २00 ते ५00 रुपयांपर्यंत रोजगार मिळवितात. त्या रोजदारीतून ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. याच व्यवसायावर सुवर्ण कारांगिरांच्या जीवनाचा गाडा चालतो. मात्र, मागील १५ दिवसांपासून सराफा दुकाने बंद असल्यामुळे कारागिरांच्या रोंजदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज हाती आलेले काम करून पैसे कमावणाऱ्या कारागिरांचा अचानक रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना कुटुंबीयांच्या उदरनिवाहार्चा प्रश्न भेडसावत आहे. सुवर्ण कारागिरांचे ‘हातावर कमावणे व पानावर खाणे’ असा नित्यक्रम असल्यामुळे त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. भंडारा जिल्ह्यात जवळपास ३ हजार कारागीर विविध सराफा व्यावसायिकांकडे काम करतात. दररोज २ ते ५ ग्रॅम सोन्याचे काम करून ते रोजगार मिळवितात. मात्र, या बंदमुळे सुवर्णकारागिरांचा दररोज सुमारे ३० लाख रुपयांचा रोजगार बुडत असल्याचे सुवर्णकार संघाचा अंदाज आहे. मागील १५ दिवसांपासून दुकाने बंद असल्यामुळे सराफा व्यावसायीकांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे, त्यातच दुसरीकडे कारागिरांवरही उपासमारीचे संकट बळावले आहे.केंद्र शासनाने लागू केलेला आबकारी शुल्क मागे घेण्यासाठी बंद पुकारला आहे. कारागिरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रोजीरोटीसाठी अन्य कामे करावी लागत आहेत. सदर शुल्क मागे घ्यावा, अशी संघटनेची मुख्य मागणी आहे.- तुषार काळबांधेसचिव, सराफा युवा असोसिएशन, भंडारा.
तीन हजार सुवर्ण कारागिरांवर उपासमारीचे संकट
By admin | Updated: March 16, 2016 08:30 IST