भंडारा : हिवाळ्याची चाहूल लागताच भंडारा शहरात गरम कपडे आणि स्वेटरची दुकाने सजली आहेत. चौकासह शहरातील मोठा बाजार परिसरात विविध प्रकारच्या ऊबदार कपड्यांची दुकाने सजली आहेत.दिवाळीनंतर आता थंडीचा जोर वाढत चालला आहे. थंडीपासून संरक्षण म्हणून ऊबदार कपड्यांना मोठी मागणी असते. हिवाळ्यातील ऊबदार कपडे आणि विविध प्रकारच्या आधुनिक स्वेटरच्या माध्यमातून ग्राहकवर्ग कॅश करण्यासाठी छोटे-मोठे व्यावसायिक सरसावले असल्याचे दिसून येते. स्थानिक शहरात अनेक ठिकाणी आणि खास करुन बाचार चौक ते गांधी चौक रस्त्याचा दरम्यान विविध प्रकारच्या स्वेटरची दुकाने सजली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीचे कपडे खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी होऊ लागली आहे. मोठा प्रमाणात ऊबदार कपड्यांचा खप वाढत चालला आहे. विविध रंगसंगती व डिझाईनला महिला प्राधान्य देतात, असे व्यावसायिकांनी सांगितले. महाविद्यालयीन विद्याथीर्ही मोठा प्रमाणात येत असून, त्यांचा कल ब्रँडेड कपड्यांकडे असल्याचे दिसून येते. तरुणाई महाग व फॅशनेबल कपड्यांना पसंती देताना दिसत आहेत. तरुणाई एकत्रितपणे खरेदीसाठी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुकानेही फुललेली दिसतात. शहरातील थंडीत वाढ झाल्यामुळे बाजारात लोकरीच्या ऊबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. लहानापासून ते ज्येष्ठांसाठीचे विविध डिझाईनचे स्वेटर व जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. शहरात बाजार चौकातील दुकानांमध्ये ऊबदार कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. तसेच रस्त्यालगत थाटलेल्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी होत आहे.लहान मुलांच्या हातमोजापासून ते विविध लहान-लहान सुंदर बंद गळाचे जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. मऊ कापसाचे सुंदर स्वेटर आणि क्विक ड्रायची मुलांचा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी खरेदी केली जात आहे. थंडीमध्ये लहान मुले व ज्येष्ठांची जास्त काळजी घेतली जाते. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत लोकरीचे कपडे परिधान केले जातात. खासकरून विविध रंगसंगती असलेले वस्त्रे वापरण्याकडे महिलांचा कल वाढू लागला आहे. आपल्या ड्रेसप्रमाणे आपला थंडीचा पेहराव असावा, असे महिलांना वाटते. यामुळे विविध फॅशनेबल कपडे घालण्याकडे कल असतो. दुकानांमध्ये वूलनचे सर्व ट्रेंडस् पाहायला मिळत आहेत. दुकानांमध्ये विविध प्रकारचे स्वेटर, मफलर, हॅन्ड ग्लोव्हज, महिलांचे स्टोल, शॉल, सॉक्स, कानटोपी, हातमोजे, कानपट्टी, टोपी, कॅप्स अशा वस्तूंना मागणी आहे. बाजारात थंडीचे जॅकेट्स ३०० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. महिला व पुरुषांचे थंडीचे टू इन वन जॅकेट हेदेखील साधारणत: ३०० रुपयांपासून आहेत. महिलांची जास्त पसंती टू इन वन जॅकेटला आहे. कारण असे जॅकेट दोन्ही सिझनला वापरता येते. लहान मुलांची मंकी कॅप, गोली कॅप ७० रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहे. सॉक्स व हॅन्डग्लोज ४० रुपयांपर्यंत आहेत. ऊबदार कपड्यांच्या दुकानांवर गर्दी होत असल्याचे चित्रआहे. महिलांसाठी विविध प्रकारचे स्वेटर, स्वेटर शर्ट, जॅकेट्स, हातमोजे, पायमोजे, स्टोल्स, कानपट्टी बाजारात आल्या आहेत. विविध डिझाईन व रंगामधील विविध प्रकारच्या सुट्सना महिलांकडून पसंती मिळत आहे. (नगर प्रतिनिधी)
भंडारा जिल्ह्यात गरम कपड्यांची दुकाने सजली!
By admin | Updated: November 6, 2014 01:01 IST