भंडारा : डॉक्टरांच्या संपामुळे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. गरीब रुग्ण जे संपकाळाच्या आधीपासून रुग्णालयात भरती आहेत त्यांचे हाल होत आहेत. तेव्हा जिल्हा प्रशासनाने त्वरीत डॉक्टरांची पर्यायी नियुक्ती करून रुग्णसेवा सुरळीत करावी. या काळात शासकीय रुग्णालयातील एकही रुग्ण दगावल्यास त्यास जबाबदार जिल्हा प्रशासन राहील असा इशारा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्रवीण उदापुरे यांनी दिले आहे.डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपामुळे भंडारा येथील सामान्य रुग्णालयातील भरती रुग्णांचे अत्यंत हाल होत आहेत. रुग्णांना नागपूर येथील विभीन्न दवाखान्यात पाठविण्याचा सल् ला देण्यात येत आहे. गरीब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना ही बाब परवडण्यासारखी नाही. गंभीर आजाराचे रुग्ण नागपुरला हलवत असताना दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे ४०० खाटांचे भंडारा सामान्य रुग्णालय हे राज्यातील क्रमांक २ चे सर्वात मोठे सामान्य रुग्णालय आहे. येथे उपचारासाठी भंडारा जिल्हाच नव्हे तर छत्तीसगड व मध्यप्रदेशातून सुद्धा अनेक रुग्ण उपचारासाठी भरती होत असतात. प्रसूतीसाठी आलेल्या महिला व बालरुग्ण जे संपाच्या आधीपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती आहेत त्यांचे बरेच हाल होत आहेत. संपावर बसलेल्या डॉक्टरांचे शहरात सुसज्ज नर्सींग होम असून प्रसूतीसाठी आलेल्या महिला रुग्ण व इतर रुग्णांना आप्या रुग्णालयात वळविल्या जात असल्याचा गंभीर आरोपही उदापुरे यांनी केला आहे.आपण जिल्हा शल्यचिक्तिसक व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटून तसेच सामान्य रुग्णालयाचा आढावा घेऊन कॅज्युअॅल्टी वॉर्ड, अतिदक्षता कक्ष, प्रसूती कक्ष, डायलेसीस कक्ष, बाल रुग्णांच्या वॉर्डासाठी तसेच पोस्टमार्टमच्या सुविधेसाठी बाहेरील डॉक्टरांच्या सेवा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. असे उदापुरे यांनी सांगितले. याउपरही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्यास जिल्हा प्रशासन यास सर्वस्वी जबाबदार राहील व त्याचे गंभीर परिणाम त्यास भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत
By admin | Updated: July 3, 2014 23:23 IST