गावात तणाव : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जण ताब्यातसाकोली : घराशेजारी राहणाऱ्या पाच जनांशी भांडण झाल्याने व मारहाण केल्यामुळे एका इसमाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या पाच जणाविरूद्ध गुन्ह्याची नोंद करून ताब्यात घेतले आहे. ही घटना तालुक्यातील बाम्पेवाडा येथे काल रात्री घडली. महेश लहू खोटेले (३५) रा. बाम्पेवाडा असे मृतकाचे नाव आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, महेश खोटेले यांच्या घराशेजारी गिरीजी शहारे यांचे घर आहे. काल शहारे यांचा घर पडल्याने महेश खोटेले यांनी शहारे यांच्या घरचा मीटर बंद करण्याकरीता सांगितले. यावरून प्रभू कोरे व महेश खोटेले यांच्यात वाद झाला. नितीन कोरे, पवन कोरे, प्रमिला कोरे व लीला कोरे यांनी संगनमत करून मारहाण केली. यानंतर महेशने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार बळीराम भेंडारकर यांनी साकोली पोलीस ठाण्यात दिली.तक्रारीवरून साकोली पोलीस रात्रीच बाम्पेवाडा येथे गेले व महेशचा मृतदेह विहीरीतून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र विहीर खोल असल्यामुळे व पाणी जास्त असल्यामुळे रात्री प्रेत काढण्यात अडचण आली. त्यामुळे आज सकाळी महेशचा मृतदेह विहीरीतून काढण्यात आला. यादरम्यान बाम्पेवाडा येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तक्रारीवरून पोलिसांनी प्रभु कोरे, नितीन कोरे, पवन कोरे, प्रमिला कोरे व लीला कोरे या पाचही जनांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भांदवि ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. तपास साकोली पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
बाम्पेवाडा येथे इसमाची आत्महत्या
By admin | Updated: August 5, 2015 00:48 IST