पटेल महाविद्यालयात उपक्रम : जिल्हास्तरीय युवा संमेलनभंडारा : शहरातील जे. एम. पटेल महाविद्यालयात सोमवारला जिल्हास्तरीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या संमेलनामध्ये अवयव दान महादान या विषयावर निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या संमेलनाच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. तसेच याप्रसंगी जिल्हास्तरीय उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक, स्वयंसेविका पुरस्कार सुद्धा देण्यात आला. उपरोक्त संमेलन प्रा.डॉ.राजेंद्र शाह, रासेयो जिल्हा समन्वयक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडला असून याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.नितीन तुरस्कर हे उपस्थित होते. संमेलनाला आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडाराचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश कोलते, विदर्भ महाविद्यालय लाखनीचे रासेयो अधिकारी धरमशहारे यांच्यासह अनेक महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी उपस्थित असून प्रा.डॉ.शाम डफरे यांच्या अध्यक्षतेखाली हे युवा संमेलन पार पडले.या जिल्हास्तरीय संमेलनामध्ये आठवले समाजकार्य महाविद्यालय, भंडाराने सर्वाधिक पुरस्कार कमाविले. याप्रसंगी झालेल्या स्पर्धामध्ये महाविद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविला. घोषवाक्य स्पर्धा प्रथम क्रमांक काजल कृष्णकांत मोटघरे, द्वितीय आरती नागपुरे, निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक गितीका गहाणे, पोस्टर स्पर्धा तृतीय क्रमांक श्वेता मडावी यांनी क्रमांक मिळविले. याशिवाय जिल्हास्तरीय उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक म्हणून आठवले समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर भुरे याची निवड करण्यात आली तर उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून सुरेखा गायधनी हिची निवड करण्यात आली. यांच्याव्यतिरिक्त महाविद्यालयातील विवेक गायधने, पूजा बालपांडे, आकाश थानथराटे, महादेव बिसने, स्नेहलता रामटेके, मंजुषा बावणे, आरती पासवान यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंदनसिंग रोटेले, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश कोलते यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना व सहकारी मित्रांना दिले. (प्रतिनिधी)
युवा संमेलनामध्ये आठवले समाजकार्य महाविद्यालयाला सर्वाधिक पुरस्कार
By admin | Updated: March 24, 2017 00:38 IST