पचारा येथील घटना : दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळातुमसर : बाळ जन्माला येण्याचा आनंद मातापित्यांसाठी अवर्णनीय असतो, अशा आनंदाच्या क्षणी जन्माला येणाऱ्या बाळाच्या पित्याने आत्महत्या करावी, यापेक्षा दुदैव ते कोणते? तुमसर तालुक्यातील पचारा येथील कोल्हे कुटुंबीयांत शुक्रवारच्या रात्री बाळ जन्माला आले आणि त्याच रात्री पित्याने आत्महत्या केल्याची दुर्दैैवी घटना घडली.तिलकानंद कोल्हे (३०) रा.येवला ता.कटंगी जि.बालाघाट असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तिलकानंद हे कामानिमित्त तुमसर तालुक्यातील पचारा येथे काही महिन्यांपूर्वी राहायला आला होता. तुमसर परिसरात गवंडी काम करुन पत्नी व लहान मुलीसोबत राहत होता. शुक्रवारला रात्री नऊ वाजेच्या सुमारास तो येरलीपासून काही अंतरावर असलेल्या नाल्याकडे एकटाच निघाला. नाल्याजवळ रात्री ९.३० च्या सुमारास त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान याच मार्गाने जात असलेल्या ईश्वरदयाल बिसने यांना नाल्याच्या काठावर कुणीतरी इसम पडलेला असल्याचे त्यांनी तुमसर पोलिसांना सांगितले.पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत तिलकानंदचा मृत्यू झाला होता. त्याच्या एका हातात विषारी द्रव्य असलेली काचेची रिकामी शिशी आढळून आली. दरम्यान, त्याच रात्री १० वाजेच्या सुमारास तिलकानंदच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही घटना तिला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शनिवारला सकाळी सांगण्यात आली. घटना सांगत असतानाच तिने हंबरडा फोडला आणि घरी जमलेले ग्रामस्थ गहिवरले. तुमसर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले. याघटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तिलकानंदच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच आत्महत्येचे कारण कळू शकेल. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)एकाकी पडली माऊलीएकीकडे पतीच्या मृत्यूचे दु:ख आणि दुसरीकडे बाळाच्या जन्माचा आनंद अशा द्विधा स्थितीत ही माऊली सापडली. पतीच्या मृत्यूने दु:खात सापडलेल्या या मातेची अवस्था पाहताना अनेकांनी अश्रुला वाट मोकळी करुन दिली. तीन वर्षाची मुलगी आणि आता मुलगा यांची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली आहे. पतीने असे का केले असावे, हा प्रश्न त्या माऊलीला संत्रस्त करीत आहे.
इकडे बाळाचा जन्म तिकडे पतीचा मृत्यू
By admin | Updated: November 15, 2014 22:40 IST