खराशी : परिसरातील गारपीटग्रस्त अजूनही चिंतेच्या वातावरणात आपले दिवस काढत आहेत. त्यातच पुन्हा एकदा प्रशासनाच्या माध्यमातून भर घालण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. गारपीटग्रस्तांना मदतीची घोषणा होऊन महिने दोन महिने लोटले. मदतीचा पैसाही संबंधित विभागापर्यंत पोहचला. मात्र अनेक गारपीटग्रस्तांनी आपले बँक खाते सादर केल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून बँक खाते लिहितांना मोठ्या प्रमाणात चुका झाल्याने अनेक गारपीटग्रस्त अजूनही मदतीपासून वंचित आहेत. परिसरातील अनेकांच्या खात्यावर घरांच्या नुकसानीचे पैसे जमा झालेत. त्यांनी ते आपल्याआपल्या खात्यावरून उचलले.
मात्र अजूनही अनेकांच्या बँक खात्यावर पैसे जमा न झाल्याने गारपीटग्रस्तांच्या मनात रोष आहे. अर्ध्या लोकांना मदत मिळाली आम्हाला का नाही असा सवाल करीत प्रशासन सामान्य माणसांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप गारपीटग्रस्त करीत आहेत. या मागील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता परिसरातील लोकांनी आपले बँक खात्याच्या पुस्तकाची प्रत महसूल विभागाकडे सुपूर्द केली. मात्र या विभागाच्या कर्मचार्यांनी बँक खाते लिहितांना आकडे चुकीचे लिहिल्यामुळे अनेक गारपीटग्रस्तांना प्रशासनाच्या चुकीमुळे मदतीसाठी विलंब होत असल्याची माहिती प्राप्त झाली.
विशेष म्हणजे संबंधित विभागाची यामध्ये चुकी असूनसुद्धा तेच शिरजोर होऊन ज्यांचे खाते क्रमांक चुकीचे लिहिले गेले त्यांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन दुरुस्ती करण्याचे आदेश देत आहेत. यामुळे रोजची मजुरी सोडून, तिकिटांचा खर्च करून तहसील कार्यालयाच्या पायर्या झिजविण्याचे काम गारपीटग्रस्तांपुढे आहे. यामध्ये त्यांना शारीरिक, मानसिक त्रास तर होतोच. मात्र आर्थिक फटकाही बसत आहे. गारपीटग्रस्त गावागावात अर्ध्यांना मदत मिळाली. अर्ध्यांना का नाही अशा चर्चा सुरु आहे. (वार्ताहर)