कारवाईची मागणी : गावाचे नियोजन कसे होणार, ग्रामसेवक तथा पदाधिकारी फिरकलेच नाहीतुमसर : तहकुब झालेली ग्रामसभा गुरुवारी ठरविलेल्या दिवशी झाली नाही. ग्रामपंचायत कार्यालयात कुणीच पदाधिकारी फिरकला नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी तथा ग्रामसेवकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गावाचे नियोजन करणारी सभा न घेण्यामागे नेमके कारण कोणते असा प्रश्न उपस्थित होत आहे. तहकुब ग्रामसभेला पदाधिकारी व ग्रामसेवकाने खो दिला आहे.दि.२ आॅक्टोबरला केंद्र तथा राज्य शासनाच्या आदेशानुसार ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे. डोंगरला येथे कोरम अभावी ग्रामसभा तहकुब करण्यात आली. दि. १३ आॅक्टोबरला तहकुब ग्रामसभा घेण्याची नोटीस काढण्यात आली. या नोटीसमध्ये ग्रामसभा दुपारी १२ वाजता सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आली होती. तहकुब ग्रामसभेत आमचा गाव आमचा विकास अंतर्गत सन २०१६-१७ चा वार्षिक आराखडा अंमलबजावणी आढावा घेणे, माता व बालकामध्ये असणारे कुपोषण १०० टक्के उच्चाटण करण्याकरिता कुपोषण निर्मूलनाचा लाभ घेणे, २१ सप्टेंबर २०१२ च्या परिपत्रकाचे वाचन करणे, सन २०१६-१७ ची कर वसुली बाबत चर्चा करण्यात येणार होती.दुपारी २.३० वाजता ग्रामपंचायतीला कुलूप बंद करून परिचर कर्मचारी भोजनाकरिता निघाले. ग्रामपंचायत कार्यालयाकडे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक फिरकले नाही. तहकुब ग्रामसभेची नोटीस काढून स्वत:च अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी डोंगरला येथील सामाजिक कार्यकर्ता अंकुश बनकर यांनी केली आहे.डोंगरला येथे नऊ सदस्यीय ग्रामपंचायत असून सुमारे २५०० गावाची लोकसंख्या आहे. ग्रामीण रोजगार हमी प्रकरणात येथील तत्कालीन सचिवासोबत पंचायत समितीचे काही कर्मचारी, अधिकारी निलंबित झाले होते. अधिकारी कर्मचाऱ्यांनी रोख रक्कम शासनदरबारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जमा केले होते. या प्रकरणात ग्रामपंचायतीवर मात्र कारवाई प्रलंबित आहे.यासंदर्भात येथील ग्रामसेवक सी.एम.खांडगाये यांचेशी दि. १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता ५.१० मिनिटांनी व ५.३० मिनिटांनी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो बंद होता. (तालुका प्रतिनिधी)
तहकूब ग्रामसभेला डोंगरला ग्रामपंचायतीचा खो
By admin | Updated: October 15, 2016 00:36 IST