नाना पटोले : दहेगाव येथे पोलीस प्रशासनातर्फे जनजागरण मेळावा लाखांदूर : शासनाच्या धोरणांचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे, प्रत्येक घरी रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध झाले पाहिजेत, रोजगार निर्मिती हेच शासनाचे धोरण असल्याने आपल्या भागात घरोघरी शासनाच्या योजना पोहोचल्या तरच समाधान होईल, त्यासाठी जनता व प्रशासनाचा समन्वय महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील दहेगाव (मा.) येथे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आयोजित जनजागरण मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, मुख्य कार्यपालन अधिकारी एन. एस. अहिरे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे, जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे, माधुरी हुकरे, भारत मेहेंदळे, सभापती मंगला बगमारे, सरपंच सुनीता काकोडे, चोपराम डोंगरावर, उपसभापती लखन बर्वे, गोसू कुंभारे, बाबुराव डोंगरावर, तहसीलदार यु. एम. तोडसाम, खंडविकास अधिकारी डी.एम. देवरे, वनपरीक्षेत्राधिकारी दोनोडे उपस्थित होते. यावेळी खा.पटोले म्हणाले, वनहक्काचे दावे लवकरात लवकर निकाली निघतील. दहेगाव येथील हा प्रकल्प लवकरच सुरू होऊन जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना १६ तास वीज पुरवठा उपलब्ध होणार, मात्र समाजातील शेवटचा कुटुंब आर्थिक प्रगती कसा करेल, यासाठी शासनाचे नवे धोरण महत्त्वाचे राहणार आहे. आमदार बाळा काशिवार म्हणाले, जनतेने शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घेऊन जीवनमान उंचावण्याचे आवाहन केले. यासाठी प्रशासनाकडून अडचणी येत असतील तर संबंधित अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांची मदत घेण्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत विकास देशाच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगून सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी म्हणाले, जनता व अधिकारी यांच्यात समन्वय आवश्यक आहे. त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्यास योजना यशस्वी होऊ शकत नाही, प्रशासन जनतेच्या पाठिशी असून योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू म्हणाल्या, जनतेने पोलीस विभागाला घाबरण्याचे कारण नाही, योग्य मार्गाचा अवलंब करा, अन्याय झाला असेल तर पोलिसांची मदत घ्या, पोलीस विभागाला जनतेच्या सहकार्याची गरज आहे. समाजात विघातक कृत्ये करणाऱ्याच्या नादी लागून वाईट मार्ग धरू नका, असे आवाहन केले. यावेळी विविध योजनांची माहिती नागरिकांना समजावून सांगण्यात आली. नक्षल प्रभावित गावात नक्षलवाद्यांना गावबंदी करणारे तालुक्यातील मुर्झा व पुयार या दोन गावांना शासनाकडून प्रत्येकी ३ लाख रूपयांचा निधी देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक बी. जे. यादव यांनी केले. संचालन योगेश कुठे यांनी केले. कार्यक्रमासाठी दिघोरी (मोठी) पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, गावकऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
रोजगार निर्मिती हेच शासनाचे धोरण
By admin | Updated: December 27, 2016 01:07 IST