मुख्यमंत्र्यांना निवेदन : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणीसाकोली : तालुका प्रतिनिधी: प्रस्तावित नवीन जिल्हे निर्मितीवेळी साकोली जिल्हा बनविण्यात यावा, या मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांना साकोलीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले. देशात इंग्रजांची सत्ता असताना तत्कालीन इंग्रज सरकारने भंडारा जिल्ह्यात तीन उपविभाग बनविले होते. ज्यात, भंडारा जिल्ह्यासह उपविभाग, गोंदिया उपविभाग व साकोली उपविभाग हे होते. यापैकी त्यावेळेस भंडारा हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ (मुंबई ते कलकत्ता) चे बाजूला २ कि. मी. अंतरावर होते. आता ते विकसित होवून राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. गोंदिया हे शहर मुंबई हावडा रेल्वे मार्गावर आहे. तसेच साकोली हे शहर असे आहे की, ज्याचा थेट राज्य महामार्गावर संपर्क आहे. या तीन उपविभाग मुख्यालयापैकी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हा बनविण्यात आला. अर्थात गोंदिया उपविभागाचे महत्त्व कायम आहे.या जुन्या उपविभागापैकी साकोली हे सद्या उपविभाग आहे. या साकोली शहराला नवेगांव, नागझिरा हे व्याघ्र प्रकल्पाचे परिसर लागून आहे.राष्ट्रीय महामार्गाचे मधोमध असल्यामुळे या शहराची दळणवळण मोठया प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे नवनिर्मित गोंदिया जिल्ह्यामध्ये जे काही तालुके जोडल्या गेले त्यांना गोंदिया जिल्हा मुख्यालय हे अनेक कारणाने गैरसोईचे आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आणि इंग्रजकालीन उपविभाग मुख्यालयाचे महत्त्व अधोरेखीत कायम रहावे यादृष्टीने साकोली जिल्हा बनविणे आवश्यक आहे. मध्यंतरी वर्तमानपत्रातील वृत्तावरून व विधी मंडळाच्या कामकाजाच्या वृत्तावरून असे कळले की, शासन राज्यात जे नवीन जिल्हे व तालुके बनविणार आहे. त्यात साकोली जिल्हा प्रस्तावित आहे. मात्र,आता असे कळले की, नवीन जिल्हा व तालुका निर्मिती संबंधाने राज्याचे मुख्य सचिवाचे अध्यक्षेतेखाली जी समिती नेमण्यात आली त्या समितीसमोर प्रस्तावित केलेल्या जिल्ह्यामध्ये साकोली जिल्ह्याचे प्रस्ताव नाही. प्रस्तावित नवनिर्मित जिल्ह्याचे वेळी साकोली जिल्हा बनविण्यात यावा, त्याचप्रमाणे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ज्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी आहे जसे सानगडी, पालांदूर, अड्याळ (भंडारा जिल्हा) व चिचगड, दवनीवाडा, रावणवाडी, नवेगावबांध(गोंदिया जिल्हा) हे नवीन तालुके बनविण्यात यावे आदी मागण्या निवेदनातून केल्या आहे.शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, पी. एस. मेश्राम, काशीराम बावणे, नामदेव लांबकाने, शांताराम शेंडे, राजू बडोले, चरणदास सोनवाने, शब्बीर शेख, विश्वनाथ बडोले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
साकोलीला जिल्ह्याचा दर्जा द्या
By admin | Updated: August 1, 2016 00:24 IST