मुख्यमंत्र्यांना निवेदन : सुनील सूर्यवंशी यांची मागणीचिचाळ : एकेकाळी राजाश्रय प्राप्त असलेल्या लोहार समाजाला आज घडीला हाताला काम मिळणे अशक्य झाले आहे. गवताच्या झोपडीत वास्तव्य करणारे दारिद्र्यात खितपत पडलेले अंधकारम जीवन जगणाऱ्या लोहार समाजाला शासनाने घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी लोहार समाज पवनी तालुका उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.लोखंडाच्या वस्तू बनविणारा हा लोहार समाज प्रत्येक शहरी व ग्रामीण भागात अल्प संख्येत आढळतो. जिल्ह्यात या समाजाचे लोक झाडाच्या सावलीत किंवा तलाव लगत दुकाने थाटून कामे करताना आढळतात. लहानशा घरात किंवा गवताच्या झोपडीत आपल्या कुटुंबीयांसोबत उदरनिर्वाह करतो. प्राचीन काळात लोहार ही उच्च जात समजली जायची. शेतकऱ्यांच्या कृषीविषयक कामासाठी लागणारी अवजारे बैलंबडी, लाकडी नांग, नांगराचा फार, वखर, कास, धान्य कटाईकरिता लागणारा विळा इत्यादी शेतीउपयोगी साधने तयार करून लोहार समाज पोट भरत असे. पूर्वीच्या राजेशाही काळात युद्धाची हत्यारे बनविणारा मुख्य कारागीर लोहारचं असल्यामुळे त्याला राजाश्रय प्राप्त होता. आता यंत्राद्वारे होणारे लोखंडी वस्तूचे उत्पादन ज्यात मुख्यत्वे शेतीची अवजारे घरगुती वापराच्या वस्तू दर्जेदार व कमी खर्चात उत्पादित होत असल्यामुळे परंपरांगत लोहारी कामाचा हळूहळू ऱ्हास होत गेला. सध्या लोहाराला काम मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावत गेली आणि आज तो अत्यंत हलाखीचा परिस्थितीत जीवन जगत आहे.या समाजाला अगोदरच भरपूर जातीचा समाविष्ट असलेल्या एन.टी. (ब.) भटक्या जमातीमध्ये समाविष्ट करून तोंडाला पाने पुसली आहेत. सदर समाजातील दैनावस्था बघता शासनाने लोहार समाजाचा घरकूल आरक्षण जाहीर करण्याची मागणी लोहार समाज संघटन पवनी तालुका उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी व लोहार बांधवांनी केली आहे. (वार्ताहर)
लोहार समाजाला घरकूल द्या
By admin | Updated: August 29, 2015 00:51 IST