भाकपचा मेळावा : कानगो यांचे प्रतिपादनभंडारा : महाराष्ट्रात धर्मांध संघटना मोकाट सुटलेल्या आहेत. गोविंद पानसरे, डॉ.दाभोलकर, डॉ.कलबुर्गी यांच्या खुनाच्या संदर्भात या संस्थांवर संशय व्यक्त झाला होता. आता या संस्थेच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. शासनाने यांचा त्वरित बंदोबस्त करावा, असे प्रतिपादन डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कौंसिलची सभा राणा भवन भंडारा येथे झाली. यावेळी कानगो बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शांता बावनकर तर उपस्थितांमध्ये तुकाराम भस्मे, शिवकुमार गणवीर व हिवराज उके यांचा समावेश होता. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वाढत्या महागाईविरोधी व दुष्काळाच्या गंभीर समस्या संदर्भात कर्जमाफी, वीज माफी व अन्य मागण्या मान्य करण्यास शासन टाळाटाळ करीत असल्यामुळे ५ आॅक्टोबर रोजी निषेध दिन पाळण्यात येणार आहे. सनातनवरील बंदीच्या मागणीसाठी २४ नोव्हेंबरला पानसरे यांच्या जन्मदिवशी आंदोलन करण्याचे पक्षाने ठरविले असल्याची माहिती मान्यवरांनी दिली. याप्रसंगी मंचावर सदानंद इलमे, माधवराव बांते, माणिकराव कुकडकर, योगराज ताईतकर विराजमान होते. प्रास्ताविक हिवराज उके यांनी केले तर आभार रत्नाकर मारवाडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
धर्मांध संघटनांवर आळा घाला
By admin | Updated: September 30, 2015 00:49 IST