लाभार्थ्यांची शस्त्रक्रियेसाठी पायपीट : चार महिन्यांपूर्वी केली होती नोंदणी तुमसर : ईश्वरदत्त अमूल्य जीवनाची जोपासना आज गरिबांकरिता अवघड ठरली आहे. देव्हाडी येथे ३२ वर्षीय एका गरीब युवकाला हृदय आजाराने ग्रासले आहे. औषधे उपलब्ध नाही म्हणून त्याची शस्त्रक्रिया लांबली. चार महिन्यापासून रुग्णालयातून फोन येईल याची प्रतीक्षा हा युवक करीत आहे. दिवसेनदिवस त्याची प्रकृती ढासळत आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा येथे फज्जा फडालेला दिसतो.गंगाधर चैतराम उईके (३२) रा.सुभाष वार्ड देव्हाडी हे हृदयरोगाने आजारी आहेत. त्यांनी नियमानुसार केंद्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत नाव समाविष्ट आहे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला हृदयरोग शस्त्रक्रिया तात्काळ करण्याचा सल्ला दिला होता. गरीब व मजुरी करणारे गंगाधर यांनी प्रथम भंडारा नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे उपचाराकरिता दाखल झाल्यावर त्यांनीही तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.या योजनेत समाविष्ट रुग्णालयांची यादी शासनानेच जाहीर केली आहे. शासकीय रुग्णालय नागपूर येथील डॉक्टरांनी गंगाधर याला सुपर स्पेशालीटी रुग्णालयात शस्त्रक्रियेकरिता जाण्याचा सल्ला दिला. गंगधर सुपर स्पेशालिटीत गेल्यावर त्यांना औषधे उपलब्ध नाहीत, तुम्हाला रुग्णालयातून फोन येईल तेव्हा तुम्ही शस्त्रक्रियेकरिता याल असे सांगीतले. चार महिन्याचा कालावधी लोटला तरी अजूनपर्यंत सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलमधून फोन आला नाही. गंगधर यांनी सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाकडे धाव घेतली, परंतु तेथूनही अजूनपर्यंत बोलाविणे आले नाही. दिवसेंदिवस गंगाधरची प्रकृती खालावत चालली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना प्रारंभ करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून नागपुरातून या योजनेचा शुभारंभ दि. २१ नोव्हेंबर रोजी सोनिया गांधी यांनी केला होता हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)
गंगाधर आजही बघतो रुग्णालयाच्या फोनची वाट
By admin | Updated: August 10, 2014 22:49 IST