टोळीत पाच जणांमध्ये दोघे अल्पवयीन : तुमसर, सिहोरा, आंधळगाव परिसरातून केली होती धानाची चोरीतुमसर : तुमसर, आंधळगाव व सिहोरा परिसरात शेतातील धान चोरणाऱ्या टोळीला तुमसर पोलिसांनी सापळा रचून सोमवारला अटक केली. गोपणीय माहितीच्या आधारे पोलिसांना या चोरट्यांचा सुगावा लागला होता. मागील वर्षभरापासून या टोळीने उच्छाद मांडला होता. या टोळीत पाच जणांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.प्रदीप लंजे, महेंद्र सोयाम व सहसराम नागपुरे सर्व रा.सोंड्याटोला असे धान चोरट्यांची नावे आहेत. यात दोन आरोपी अल्पवयीन आहेत. या आरोपींविरुद्ध तुमसर पोलिसांनी भादंवि ३६९ कलमान्वये सिहोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्या मंगळवारला या आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात येणार आहे. याशिवाय सिहोरा येथे तीन व आंधळगाव पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमसर, सिहोरा व आंधळगाव शेतशिवारातून धानाची चोरी या टोळीने केली होती. रात्रीला ही टोळी मळणी झालेले धान शेतातूनच शिताफीने चोरी करायचे. याप्रकरणी ज्यांचे धान चोरीला गेले होते, त्यांच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे या टोळीला पकडण्याचे आव्हान तुमसर पोलिसांसमोर होते. तेव्हापासून तुमसर पोलीस आरोपीच्या मागावर होते. गोपनीय माहितीच्या आधारे या टोळीला जेरबंद करण्यात तुमसर पोलिसांना यश आले. सराईत चोरट्यांना लाजवेल, अशा पद्धतीने या टोळीने अशी चोरी केलेली होती.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक किशोर गवई यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई गिरीश पडोळे, जयसिंह लिल्हारे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
तुमसरात धान चोरट्यांची टोळी गजाआड
By admin | Updated: April 7, 2015 00:49 IST