माहितीनुसार, तालुक्यातील विरली बु गावात काही दिवसांपासून रात्रीच्या दरम्यान पाणीपुरवठा योजनेंतर्गत उपलब्ध खासगी नळांना टिल्लू पंप लावून पाणीचोरी करण्यात येत असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायत सरपंच व प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. रात्रीच्या दरम्यान टिल्लू पंपाने पाणीचोरी करण्यात येत असल्याने, गावातीलच काही नागरिकांच्या नळांना अपर्याप्त स्वरूपात पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्याचा आरोप लावला जात होता. त्यावरून घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास येथील सरपंच ग्रामपंचायत परिचरासह उपसरपंचाच्या घरी असलेल्या नळ योजनेची तपासणी करून, उपसरपंचासह घरातील अन्य सदस्यांना व परिसरातील नागरिकांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे, तर परिसरातील नागरिकांना शिवीगाळ केल्याचे पाहून सरपंचाला हटकले असता, उपसरपंचासह अन्य नागरिकांना मारपीट करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
तथापि, या मारपिटीत सरपंचाद्वारे येथील नागरिक राजेंद्र महावाडे यांना ओढले असता, त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेत स्थानिक सरपंच व उपसरपंचाद्वारे लाखांदूर पोलिसांत परस्पर विरोधी तक्रार करण्यात आल्याने, सरपंच लोकेश भेंडारकर, उपसरपंच मिलिंद सिंव्हगडे, राजेंद्र महावाडे, श्रीहरी महावाडे व अशोक महावाडे यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या परस्पर विरोधी तक्रारीवरून दाखल दोन भिन्न प्रकरणांचा तपास येथील ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात येथील सहायक पोलीस निरीक्षक पुंडलीक म्हस्के व पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे करीत आहेत.