पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील पालोरा परिसरात भुभागामाध्ये पाण्याचा स्त्रोत जास्त प्रमाणात असल्यामुळे या भागातील शेतकरी वर्षातून तिनवेळा शेतीतून उत्पादन घेत होते. विहिरीला पाण्याचा स्त्रोत जास्त प्रमाणात असल्यामुळे धानपिक मुख्य आहे. म्हणून या भागाला चौरास भाग म्हणून संबोधले जाते. मागील महिन्यापासूनच कोरडवाहू शेतकरी व ओलीताखाली शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसाचे आगमन होताच झपाट्याने शेतांमध्ये धानाचे पऱ्हे टाकले. अनेकांनी आवत्या धानाची पेरणी केली. मात्र पावसाने दडी मारताच सर्वत्र परिस्थिती विपरीत निर्माण झाली. पाण्याअभावी आवत्या धानाचे कण कोमेजले, लवलेल्या तूरी वाडल्या, हळदपिकावर विपरीत परिणाम पडला आहे. ज्या शेतकऱ्याकडे ओलीताखाली शेती आहे त्या शेतकऱ्यांनी पऱ्हे जगवून रोवणी केली आहे. पालोरा, बाम्हणी, मोसारा, लोणारा परिसरात मोटारपंपाच्या सहाय्याने रोवणी पूर्ण करण्यात आली. अनेकांचे रोवणीचे काम झपाट्याने सुरू आहे. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे व विज वितरण कंपनीच्या भारनियमामुळे झालेली रोवणी संकटात सापडलेली आहे. धान पिकाला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र पाणी मुबलक प्रमाणात होत नसल्यामुळे जागेला भेगा पडत आहे. पाण्याविना चौरास भाग वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. या महिन्यात नदी, नाले तुडूंब भरले राहत होते. परंतू वरूनराजाची कृपा होत नसल्यामुळे पावसाने कायमची तर पाठ फिरविली नाही ना, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नागरिकांच्या प्रकृती बिघडण्यामध्ये वाढ होत आहे. खाजगी दवाखाने रुग्णांनी हाऊसफूल झाले आहेत. जणू डॉक्टरांचे सुगीचे दिवस आल्यासारखे वाटत आहे. घरी होता नव्हता सर्व शेतामध्ये खर्च केल्यामुळे आता बळीराजा शासनाच्या मदतीची प्रतिक्षा करीत आहे. मात्र अच्छे दिन लायेंगे म्हणणारे पुढारी कुठे गेले म्हणून सर्वच वाट पाहत आहेत. विकास करणाऱ्या नेत्यांना आपण गमावलो, व आश्वासन देणाऱ्या नेत्यांना निवडून दिले याचा पच्छाताप येथील नागरिकांना पडला आहे. विज वितरण कंपनीकडून ५ ते ७ तासाची विद्युत मिळत असल्यामुळे रोवणी झालेल्या धान पिकांना हळद पिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. भारनियमनामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले असले तरी पिण्याच्या पाण्याची कृत्रीम टंचाई निर्माण झाली आहे. वैनगंगा नदीला पाणी नसल्यामुळे रेती माफियांचे सुगीचे दिवस सुरू आहेत. नदीला लागून आलेल्या गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. विद्युत लोड वाढल्यामुळे अनेक जनीत्र निकामी होत आहेत. याचा दुष्परीणाम सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. जोपर्यंत पाणी पडणार नाही तोपर्यंत भारनियम कमी केले जाणार नाही, असे अधिकारी सांगत आहेत. जर पाणी आला नाही तर शेतकऱ्यांचे काय हाल होतील असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. झोपलेला शेतकरी रात्री जाग येताच उठून पाहतो कि पाणी आला का, मात्र त्याला दररोज तापणाऱ्या सुर्याचे दर्शन होत आहे. पावसासाठी सारेच कासावीस झाले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर चौरास भाग पूर्णपणे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. (वार्ताहर)
चौरास भाग वाळवंट होण्याच्या मार्गावर
By admin | Updated: July 17, 2014 23:55 IST