लाखांदूर तालुका : अनेक मार्गाहून बसफेरी बंदलाखांदूर : पावसाळ्याच्या सुरूवातीला रस्त्यांची डागडुगी करण्यात न आल्यामुळे रस्ते खड्डेमय झाले. शेतातील माती ट्रॅक्टरने रस्त्यावर आल्याने रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. जानेवारी ते जुलै महिन्यात १३ अपघातात चार ठार तर १३ जण जखमी झाल्याची नोंद लाखांदूर पोलीस ठाण्यात आहे.साकोली - वडसा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ३५३ म्हणून राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरीत झाला. मागील दीड वर्षांपासून मुख्य मार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामे बंद पडून आहेत. राष्ट्रीय महामार्ग ज्या विभागाकडे आहे त्या विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा रस्ता खड्डेमय होऊन वाहतुकीसाठी जीवघेणा ठरला आहे. खाजगी वाहने, बसेस या रस्त्यावरून कसरत करीत आहेत. लाखांदूर तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची सुद्धा खस्ता हालत आहे. मोहरणा, भागाडी मार्गावर मोठे खड्डे पडून वाहतूक ठप्प झाली आहे. यामार्गावरून जाणाऱ्या सर्व बसेस, मानव विकासाच्या बसेस खड्ड्यामुळे बंद पडल्याने विद्यार्थ्यांवर शाळा बुडविण्याची वेळ आली आहे. खड्यामुळे वाहतूक बंद पडली मात्र शेतीकामे पूर्ण झाल्यानंतर चिखलाने माखलेले ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावर मातीमुळे चिखलमय झाले. यामुळे दुचाकी व मोठ्या वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. मागील काही वर्षांपुर्वी पोलीस विभाग व बांधकाम विभागाने अशा ट्रॅक्टर चालकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली होती. जानेवारी ते जुलै महिन्यात १३ अपघातात ४ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी झाल्याची नोंद लाखांदूर पोलीस ठाण्यात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत, तालुक्यातील रस्ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
जीवघेण्या खडयांमुळे सहा महिन्यांत १३ अपघातात चार ठार; १३ जखमी
By admin | Updated: August 9, 2016 00:31 IST