जांब (मोहाडी) : जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय जांब येथील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहारात सोंडे आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, शाळेला पुरवठा होणाऱ्या आहार साहित्याची चौकशी करण्याची मागणी नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य चंदू पिलारे यांनी केली आहे.जांब येथील जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालयात जिल्हा परिषद सदस्य चंदू पिलारे हे सहकारी मोहन साकुरे, विलास भिवगडे, बालचंद बालपांडे यांच्यासह शनिवारला शाळेत भेट देऊन शाळेची पाहणी केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाची आणि ते कशा प्रकारचे शिजविले जाते याची पाहणी केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना जेवनासाठी वाटाणाभात शिजवून तयार झालेला होता. वाटाणाभात असल्यामुळे ते खाण्याची इच्छा त्यांनी दर्शविली. त्यानंतर एका प्लेटमध्ये वाटाणाभात आणण्यात आला असता शिजलेल्या वाटाण्यामध्ये सोंडे असल्याचे आढळून त्यांना आले. त्यावेळी मुख्याध्यापक लांडगे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी या प्रकाराबद्दल मुख्याध्यापक लांडगे यांना विचारले असता त्यांनी विविध कामांची वेगवेगळ्या सहाय्यक शिक्षकाकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगून पोषण आहारवाटप व पाहण्याची जबाबदारी सहाय्यक शिक्षक रंगारी व भैसारे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सांगितले. याची ते शिक्षक दररोज पाहणी करीत असून आहाराचे वाटप व्यवस्थित होत असल्याचे सांगितले. आज ते शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणासाठी गेलेले असल्यामुळे आहार शिजविणाऱ्या महिलेच्या नजरचुकीने सोंडे लागलेला वाटाणा शिजलेल्या भातामध्ये आल्याचे मान्य केले. आजचा आहार विद्यार्थ्यांना देण्यायोग्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वाटप करणार नाही, असे सांगून यापुढे योग्य काळजी घेतली जाईल, असे मुख्याध्यापक लाडगे यांनी त्यांना सांगितले. वाटाणाभातामध्ये सोंडे दिसून आल्यानंतर चंदू पिलारे यांनी मोहाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गभणे यांना बोलावून शिजलेल्या वाटाणा भातातील सोंडे दाखविले. त्यांनी हा शिजलेल्या अन्नाचा पंचनामा करुन ते तपासणीसाठी पाठवित असल्याचे सांगितले. त्यानंतर चंदू पिलारे यांनी पोषण आहारामध्ये वापरण्यात येणारे साहित्य तपासले असता त्यांना मिरची पावडर बुरशी चढलेले आढळून आले. विद्यार्थ्यांना खाण्यायोग्य आहार देण्यात यावा, अन्यथा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पिलारे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांना केली आहे. (वार्ताहर)
शालेय पोषण आहारात आढळले सोंडे
By admin | Updated: July 14, 2015 01:14 IST