तुमसर येथील खून प्रकरण : जिल्हा न्यायाधीशांचा निकालभंडारा : चोरीचा आळ लावून तुमसर येथील चैतराम सेवकराम भोंडेकर (३७) यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. शर्मा यांनी ५ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तहसील अंतर्गत येणाऱ्या सिल्ली येथील चैतराम सेवकराम भोंडेकर हे आपल्या कुटुंबासह मोलमजूरी करून राहत होते. १३ मार्च २०१३ ला रात्रीच्या सुमारास तुमसर येथील अंकुश भोंडेकर, नंदू बर्वेकर हे दोघे मोटारसायकलने त्याच्या घरी आले. त्यांनी चैतरामला अंकुश भोंडेकरच्या घरी आणले. यावेळी त्यांनी ४ हजार रुपये चोरून नेल्याचा त्याच्यावर आरोप लावला व हातपाय दोरीने बांधून त्याला लोखंडी रॉड, लाठ्या काठ्या व हाताबुक्यांनी अमानुष मारहाण केली. यावेळी त्याने जीव वाचविण्यासाठी विनवण्या केल्या मात्र अंकुश भोंडेकर, त्याची पत्नी मंगला, नंदू बर्वेकर, नरेंद्र भोला यादव व बाळा राखडे यांनी त्याला बेदम मारहाण केली. रात्रभर मारहाणीनंतर त्याला पहाटेच्या सुमारास गावाला सोडून दिले. मरणासन्न अवस्थेत त्याचा मृत्यू झाला. मृतकाची पत्नी वनमालाच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी कलम ३०२, ३६४, १४७, १४८, १४९ भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली. याप्रकरणी तत्कालीन ठाणेदारांनी प्रकरण जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर. शर्मा यांच्या न्यायालयात न्यायदानाकरिता न्यायप्रविष्ठ केले. याप्रकरणी सर्व न्यायधीशांनी सर्व साक्ष पुरावे तपासून अंकुश, नंदू, नरेंद्र, बाळा व मंगला हे पाचही जण दोषी असल्याचे आढळून आल्याने त्यांना आजीवन कारावास व एक हजार रुपये दंडाची दि.२६ सप्टेंबर २०१४ ला शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिने कठोर कारावासाची सजा सुनावण्यात आली. सरकारी पक्षाकडून १८ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीतर्फे अॅड.विवेक स्वामी व अॅड.सारंग कोतवाल यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाकडून अॅड.राजकुमार वाडीभस्मे यांनी काम पाहिले. (शहर प्रतिनिधी)
पाच जणांना आजीवन कारावास
By admin | Updated: September 30, 2014 23:31 IST