लोकमत शुभवर्तमान : आयएएसच्या तयारीसाठी दिली आर्थिक मदत भंडारा : शिक्षण घेऊन उच्चपदस्थ अधिकारी होण्याची इच्छाशक्ती अनेकांची असते. मात्र त्या इच्छाशक्तीला आर्थिक पाठबळ न मिळाल्यास पाहिलेले स्वप्न बरेचदा अर्धवट राहते. परिस्थितीवर मात करीत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी भंडाऱ्यातील काही ‘दानदात्यांनी’ एकत्रित येत त्याच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. आज गुरूवारला या विद्यार्थ्याला एका छोटेखानी कार्यक्रमात ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील साखरीटोला येथील रवींद्र पुरूषोत्तम खांडेकर असे या होतकरू विद्यार्थ्याचे नाव आहे. रवींद्रने भारतीय लोकसेवा आयोगाची पहिली परिक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. मात्र पुढची तयारी करण्याच्या दृष्टिने आर्थिक बाजू कमकुवत असल्याने त्याला हा खर्च पेलणारा नव्हता. काही दिवसांपूर्वी हा विद्यार्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला. हलाखीच्या परिस्थितीमुळे रवींद्र आयएएस होण्यापासून वंचित राहू नये, यासाठी त्याला आर्थिक पाठबळ देण्याबाबत मत मांडण्यात आले. त्यानंतर अगदी कमी वेळात उद्योगपती सुनील मेंढे, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.गोपाल व्यास, नेत्रतज्ज्ञ डॉ.दुर्गेश चोले, बंडू बारापात्रे, दिलीप जैन, लॉयन्स क्लबचे सचिन कुंभलकर, भरत भलगट, शैलेश नायर, मुन्ना क्षिरसागर या दानशुरांनी ५० हजार रूपयांची रक्कम गोळा केली. स्व.अण्णाजी कुळकर्णी अभ्यासिकेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा संघचालक राम चाचेरे, नगर संघचालक अनिल मेहर, आमदार चरण वाघमारे, हिंदू रक्षा मंचचे अध्यक्ष बंडू बारापात्रे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील मेंढे, डॉ.उल्हास फडके यांच्या हस्ते रवींद्रला हा धनादेश देण्यात आला. गरजूंना मदत करून त्यांची स्वप्नपूर्ती करताना देशाला एक चांगला अधिकारी देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होत असल्याचे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठिशी राहिला असल्याचे जिल्हा संघचालक चाचेरे यांनी सांगितले. समाजातून मिळणाऱ्या उत्स्फूर्त मदतीच्या माध्यमातून रवींद्रने आयएएस होणे, हे निश्चितच अभिमानाची बाब आहे. मात्र त्यानंतर समाजाप्रती असलेले कर्तव्य लक्षात ठेवत गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी अशा लोकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार चरण वाघमारे यांनी केले. यावेळी रवींद्र म्हणाला, मला मिळालेली मदत ही बहुमूल्य असून स्वप्नपूर्तीच्या दृष्टिने अविस्मरणीय ठरणारी आहे. आयएएस होऊन लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. संचालन सुनील मेंढे यांनी केले. यावेळी विहीपचे जिल्हाध्यक्ष संजय एकापूरे, चैतन्य उमाळकर, प्रकाश खोकले हे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
‘त्याच्या’ स्वप्नपूर्तीसाठी मिळाले आर्थिक पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2016 01:27 IST