भंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक गाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गावातील मजूर आता रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली नसल्याने मजुरांना कामाच्या शोधात इतरत्र भटकावे लागत आहे. शासन, प्रशासनाच्या संबंधित विभागाने मजुरांना वर्षातून शंभर दिवस काम उपलब्ध करून द्यावे, असा शासन निर्णय आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी असली तरी अजूनपर्यंत पर्याप्त प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे मजूर रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, ही कामे सुरू करण्यास अतिविलंब होत असल्याने कामाअभावी मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्यासमोर वीतभर पोटाची खळगी कशी भरावी, असा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे. याबाबत मजुरांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे.
याप्रकरणी जिल्हा व तालुका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन भंडारा जिल्ह्यातील पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली, लाखनी या तालुक्यांतील प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक गाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, संदीप बर्वे, रतन मेश्राम, नंदू वाघमारे, मोरेश्वर लेंधारे, अविनाश खोब्रागडे, सुधाकर चव्हाण, उमाकांत काणेकर, यशवंत घरडे, सुरेश शेंडे, मिताराम शेंडे, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभुर्णे, दामोधर गोडबोले, अरूणा दामले, पपिता वंजारी, जसवंता नंदेश्वर, रूपा लेंधारे, विभा रामटेके, माधुरी सुखदेवे, सुमन वंजारी, संघमित्रा गेडाम, प्रमिला बोरकर, शर्मिला बोरकर, विशाखा बनसोड, मंदा मेश्राम, सरिता टेंभुर्णे, वनमाला बोरकर, मनीषा मेश्राम, संयोगिता खोब्रागडे, सुधाकर धारगावे, सुभाष उंदीरवाडे, जयपाल ढवळे, सुरेश उंदीरवाडे, कल्पना वानखेडे, कलावती भोवते, विद्या उंदीरवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.