प्रकरण ट्रक जाळल्याचे : भंडारा पोलिसांची कारवाईभंडारा : भारत दूरसंचार निगम अंतर्गत कामे करणाऱ्या एका कंत्राटदाराचा ट्रक पेट्रोलने पेटविल्याची घटना शहरातील गंगा संकुलासमोर घडली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दूरसंचार विभागाच्या उपअभियंत्यासह दोघांना अटक केली आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.दूरसंचार विभागाची कामे करणारे कंत्राटदार शीतल तिवारी यांच्या मालकीचा ट्रक गंगा संकुलसमोर नेहमीप्रमाणे उभा ठेवला होता. बुधवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास हा ट्रक पेटताना दिसून आला. ट्रकच्या मागच्या टायरला आग लागून नंतर ट्रक जळाला. याप्रकरणी तिवारी यांनी भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली हाती. या तक्रारीत त्यांनी ट्रक जाळल्याचा संशय दूरसंचार विभागातील उपअभियंता शफी इस्माईल शेख (५०) यांच्यावर वर्तविला होता. त्यानंतर भंडारा पोलिसांनी घटनास्थळाजवळ असलेल्या पंजाब नॅशनल बँकेसमोरील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केली असता. त्यात शेख हे त्यांच्या चारचाकी वाहनातून एका व्यक्तीसोबत आल्याचे दिसून आले. त्यांच्या संशयित हालचाली व हातात पेट्रोलच्या बॉटल असल्याचे कॅमेरात दिसून आले. त्यावरुन भंडारा पोलिसांनी त्यांच्याविरुध्द शफी इस्माईल शेख व तुमसर येथील गिरीश गडरीमा या दोघांना सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अटक केली. या दोघांनाही उद्या शनिवारला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (शहर प्रतिनिधी)
अखेर ‘त्या’ अधिकाऱ्याला अटक
By admin | Updated: May 9, 2015 00:48 IST