तुमसर : सिंदपुरी येथील तलाठी विनोद भावे यांच्याविरुद्ध सभापती शेख यांच्या तक्रारीवरून सिहोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिंदपुरी येथे २२ जुलै रोजी मालगुजारी तलावाची पाळ फुटून गाव जलमय झाले होते. येथील ३० ते ३२ कुटूंबावर बेघर होण्याची वेळ ओढवली. सध्या हे कुटुंब गावातील समाज मंदिर व हनुमान मंदिरात वास्तव्याला आहेत. आपादग्रस्तांची नावे मदतयादीत नसून जे प्रभावित झाले नाहीत त्यांची नावे तलाठी भावे यांनी यादीत समाविष्ट केली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी तलाठ्याच्या कार्यप्रणालीवर आक्षेप नोंदवून पूरपिडीतांच्या यादीचे पुनर सर्व्हेक्षण करण्याची मागणी केली. यादरम्यान तलाठी व सभापती यांच्यात वाद झाला. शेख यांनी महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याची तक्रार भावे यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी सिंदपुरी वासियांनी सिहोरा पोलीस ठाण्यात पाच तास ठिय्या आंदोलन करून तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी तहसीदार सचिन यादव यांच्याकडे महिलांनी तक्रार देऊन तलाठी भावे कार्यालयात बसून मद्यप्राशन करतात, नागरिकांशी उद्धटपणे वागत असल्याची तक्रार करुन त्यांच्या कार्यालयाची चौकशी करण्याची मागणी केली. महिलांच्या तक्रारीची दखल घेऊन नायब तहसीलदार एच.एस. मडावी यांनी पोलीस उपनिरीक्षक नाले यांच्यासोबत तलाठी कार्यालयाची पाहणी केली असता त्यांना मद्याच्या रिकाम्या बॉटल्स आढळून आल्या. तसा अहवाल तहसीलदार यादव यांना सोपविण्यात आला. त्यानंतर तलाठी विनोद भावे विरुद्ध भादंवि २९४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
तलाठ्याविरूद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: August 11, 2014 23:43 IST