मोहन भोयर
तुमसर : तुमसर तालुक्यातील डोंगरी बु. येथे जगप्रसिद्ध खुली मॅगनीज खान आहे. मॅगनीज उत्खनना दरम्यान खाणीतून लहान-मोठे दगड व मातीचा मलबा मोठ्या प्रमाणात निघतो. सदर दगड व मलब्याचा साठा खाणीपासून काही अंतरावर करण्यात येतो. या मलब्याचे मोठ्या टेकड्यांत रूपांतर झाले आहे. खाणीशेजारील बाळापूर व कुरमुडा गावांना मानवनिर्मित टेकड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात भूस्खलन होऊन दोन्ही गावे गडप होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
डोंगरी बुद्रुक येथे ब्रिटिशकालीन जगप्रसिद्ध मॅगनीज खान आहे. ब्रिटिशांनी या खाणीचा शोध लावला होता. घनदाट जंगलात हा संपूर्ण परिसर आहे. जगात अतिशय उच्च दर्जाचे मॅगनीज येथील भूगर्भात मिळते.
सध्या सदर खाणी भारत सरकारच्या अंतर्गत येतात. येथील खाण ही ओपन कास्ट आहे. खाणीतून मॅग्नेट काढतानाच्या सोबत लहानमोठे दगड व मलबा मोठ्या प्रमाणात निघतो. खाण प्रशासनाने सदर मलब्याची विल्हेवाट खाणीपासून काही अंतरावर केली आहे. मागील अनेक वर्षापासून हा मलबा घालणे सुरू आहे त्यामुळे खान परिसरात मानवनिर्मित टेकड्या तयार झाल्या आहेत. शेजारी बाळापूर व कुरमुडा ही गावे आहेत. सदर टेकड्या या गावाच्या जवळपर्यंत आलेल्या आहेत. टेकडीच्या खाली गावे असल्याने पावसाळ्यात भूस्खलन होऊन ही गावे गडप होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
टेकड्यांची उंची मोठी : डोंगरी येथील मॅगनीज खाणीतून निघणारे दगड व मलबा मोठ्या प्रमाणात निघत आहे. सदर मलबा घालून घालून त्यांना टेकड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. टेकड्यांची उंची मोठी झाल्यानंतरही सदर मलबा इतर ठिकाणी घालण्यात येत नाही. त्यामुळे हा मलबा भूस्खलनाचा धोका येथे वाढला आहे. कोट्यवधींचा नफा देणारी ही मॅगनीज खाण असून जगात या खाणीचा पहिल्या दहा खाणींत समावेश होतो, हे विशेष.
चांदमारा येथे खाण वसाहत : खाणीशेजारी असलेल्या बाळापूर या गावात खाणीतील कर्मचाऱ्यांच्या सदनिका होत्या. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी
चांदमारा रस्त्यावर कर्मचाऱ्यांकरिता सदनिका तयार करण्यात आल्या. या वसाहतीत सध्या खाणीतील कर्मचारी राहतात. परंतु बाळापूर येथील गावातील नागरिक आपल्याच घरात वास्तव्याला आहेत. त्यांनी गाव सोडायचा विचार केला तर नवीन घरे बांधण्याकरिता पैसा कोण देईल, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे जागेचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नाईलाजाने गावातच वास्तव्य करावे लागत आहे.
प्रशासनाने दखल घ्यावी : बाळापूर व कुरमुडा गावाशेजारी मानवनिर्मित टेकड्या तयार झाल्या. टेकड्यांमुळे गावाला येथे धोका निर्माण झाला आहे. कोट्यवधींचा नफा कमावणाऱ्या मॅगनीज खाणींमुळे गावातील नागरिकांना धोक्याची शक्यता आहे. अशावेळी जिल्हा प्रशासनाने संबंधित गावांचा सर्व्हे करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. मानवनिर्मित टेकड्यांची उंची येथे निश्चित करण्याची गरज आहे. खाण प्रशासनाने नवीन जागेचा शोध घेऊन तिथे मलबा व दगड टाकण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने देण्याची गरज आहे.