भंडारा : नागपूर येथे असलेल्या आपल्या तीन महिन्याच्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील वाही जलाशयाजवळ सोमवारी रात्री घडली. भरधाव इंडिका कारने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
समीर बळवंतराव तातोळे (३०) रा. विरली बुज. ता. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी सीमा आणि तीन महिन्यांची मुलगी शिवानी हिला भेटण्यासाठी नागपूर लगतच्या हिंगणा येथे सोमवारी मोटारसायकलने जात होते. पवनी तालुक्यातील वाही जलाशयाजवळ एका निळ्या रंगाच्या इंडिका कारने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्याने आसपास कुणीही नव्हते. त्यामुळे चालक आपल्या कारसह तेथून पसार झाला. गंभीर जखमी झाल्याने समीरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती विरली येथे होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ज्ञानेश्वर केशवराव चुटे यांनी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून इंडिका कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने विरली बु. येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.