प्रवाशी नेतात कोंबून : पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हमोहन भोयरतुमसरतुमसर-तिरोडा-रामटेक-भंडारा-सिहोरा-नाकाडोंगरी या मार्गावर अवैध प्रवाशी वाहतूक सर्रास सुरू आहे. अनेक वाहनधारकांजवळ वाहनांची कागदपत्रे नाही. चारचाकी वाहनात प्रवाशांना कोंबून नेण्यात येते. जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. पोलीस विभाग व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे.तुमसर, तिरोडा, रामटेक, भंडारा, सिहोरा, नाकाडोंगरी, बपेरा या मार्गावर मागील अनेक महिन्यांपासून अवैध प्रवाशी वाहतूक सर्रास सुरू आहे. बऱ्याच वाहनधारकांकडे वाहतुकीचे परवाने व अन्य कागदपत्रे नाही. ही वाहने अतिशय वेगाने धावतात. या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी कोंबले जातात, नाही प्रवाशी वाहनाच्या मागील भागात अक्षरक्ष: लटकलेले दिसतात.तुमसर शहरात ही वाहने प्रवेश करतात. हे दृश्य सर्व बघतात. परंतु बिनबोभाटपणे ही वाहने का धावतात. त्यांना कुणाचे आशिर्वाद आहे. हा मुख्य प्रश्न आहे. वाहतुक पोलीस, महामार्ग पोलीस उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची वाहने या मार्गावर नेहमी दिसतात, परंतु कारवाई मात्र शुन्य आहे. तुमसर शहरात प्रवेश करताना या वाहनांची वाहनतळे थाटली आहेत. निश्चितच त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. वाहनधारक बेरोजगार आहेत, बँकेकडून कर्ज घेवून त्यांनी वाहने खरेदी केली. तरी लोकांच्या सुरक्षा त्यांच्या वाऱ्यावर सोडता येणार नाही. रस्त्यावरील इतर वाहनधारकांना त्यांना धोका पोहचविण्याचा हक्क नाही. सुरक्षित प्रवास व सुरक्षितपणे व्यवसाय त्यांनी निश्चितच नियमा अंतर्गत करण्याकरिता पोलीस विभागाने येथे दखल देण्याची गरज आहे.
जीवघेणा प्रवास
By admin | Updated: July 21, 2016 00:27 IST