गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी धानाची रोवणी करणे सुरू केले होते. परंतु थकीत वीज बिलापोटी माडगी, बामणी, चारगाव, ढोरवाडा परिसरातील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे सिंचन कसे करावे असा प्रश्न निर्माण झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी माडगी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आमदार राजू कारेमोरे यांनाही बोलावण्यात आले. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता रूपेश अवचट कार्यालयात दाखल झाले. आमदार कारेमोरे यांनी उपकार्यकारी अभियंता रूपेश अवचट यांच्याशी चर्चा केली. कृषी पंपाची वीज जोडणी पूर्ववत करण्यात यावी व वीज पुरवठा किमान दोन तास वाढवून देण्यात यावे, अशा सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य के. के. पंचबुद्धे, देवसिंग सव्वालाखे, माडगीचे सरपंच गौरीशंकर पंचबुद्धे, चारगावचे सरपंच लक्ष्मण ढबाले, श्रीधर बोंद्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य चैनलाल मसरके, बामणीचे सरपंच रामप्रसाद काहलकर, रवी सार्वे, मनोहर वहिले, श्रीराम शेंडे, देवराम बोंद्रे, बोधानंद रोडगे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.