लाखांदूर (भंडारा) : गत काही महिन्यांपासून अज्ञात आजाराने त्रस्त एका शेतकऱ्याने गावालगतच्या जंगल शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. नाजूक मारोती खंडाते (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना तालुक्यातील पिंपळगाव को जंगल क्षेत्रात रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीला आली.
खंडाते यांच्यावर खासगी व शासकीय रुग्णालयात नियमित उपचार करून देखील प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यामुळे ते त्रस्त झाले होते. स्वमालकीच्या शेतावर जात असल्याचे त्यांनी घरच्या सदस्यांना सांगितले. मात्र, खंडाते हे शेतात न जाता गावालगतच्या जंगल परिसरात गेले. त्यांनी जंगलातीलच एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. गावकऱ्यांनी याची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली. तपास ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक गोपाल कोसरे करीत आहेत.