तुमसर : शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर डोंगराला नाल्यात मृत कोंबड्यांचा सोमवारी सकाळी खच आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुमारे ५० ते ६० प्लास्टिक पोत्यात एक हजारांवर कोंबड्या असून मृत होण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मृत कोंबड्या कुणी फेकल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डोंगराला नाल्याजवळील स्मशान घाट परिसरात सोमवारी सकाळी सुमारे ५० ते ६० प्लास्टिक पोते अढळून आले. पोत्यात काय आहे, असे कुतूहल बघितल्यानंतर कोंबड्या असल्याचे दिसून आले. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने तर झाला नाही ना अशी परिसरात चर्चा आहे. कोंबड्या तुमसर येथील आहेत की, परिसरातील गावातील आहेत याचा अद्याप शोध लागला नाही. सकाळपासून नाल्यावर तपासणीसाठी कोणतेही पथक आले नाही.
कोट
डोंगराला नाल्या शेजारील मृत कोंबड्यांबाबत अद्याप माहिती नाही. लगेच याबाबत एलडीओला चौकशी व तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे.
- बाळासाहेब तेळे, तहसीलदार तुमसर
डोंगराला नाल्यात व शेतशिवारात मोठ्या प्रमाणात मृत कोंबड्या फेकण्यात आल्या. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. कोंबड्या कुणी फेकल्या त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
- शंकर राऊत, अध्यक्ष, तुमसर तालुका काँग्रेस कमिटी