पालक संतप्त : ताटकळत राहावे लागते उभे, महसूल यंत्रणेने लक्ष देणे गरजेचेभंडारा : दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल लागल्यानंतर दाखल्यांची दहा पटीने आवक वाढली. यातून कामाचा ताण वाढला आहे. सद्य:स्थितीत सर्वच शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे विविध दाखल्यांसाठी सेतू केंद्रावर पालकांची प्रचंड गर्दी होत असते. परंतु पालकांना वेळेवर दाखले मिळत नाहीत. पालकांना सेतू सुविधा केंद्रावर सारखे हेलपाटे मारावे लागत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे. विविध दाखल्यांसाठी सेतू सुविधा केंद्रात अर्ज दाखल करताना कर्मचाऱ्यांच्या कामाच्या संथगतीमुळे नागरिकांना दोन-दोन तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. याशिवाय तेथे बसण्याची व्यवस्था नसल्याने तीन-चार दिवसांपूर्वी दोन जणांना चक्कर आल्याने ते खाली पडले होते. केंद्रावर लांबच लांब रांगा लागत असल्यामुळे तेथे बसण्याची व्यवस्था व्हावी. शिवाय संगणकांची देखील संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने दखल घेण्याची मागणी पालकांनी केली आहे. शाळा - महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी पालकांना येथील सेतू सुविधा केंद्रात प्रचंड फिरफिर करावी लागत आहे. यासोबत तेथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने अक्षरश: वैतागले आहेत. संबंधित यंत्रणेनेदेखील साफ दुर्लक्ष केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हे दाखले तातडीने मिळण्यासाठी महसूल विभागाच्या वरिष्ठ यंत्रणेने दखल घ्यावी, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.शाळा-महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. तथापि, प्रवेशासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, जातीचे दाखले आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. हे दाखले येथील नागरी सुविधा केंद्रामार्फत काढावे लागतात. त्यामुळे सेतू सुविधा केंद्रामार्फतच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु या कागदपत्रांची पूर्तता करताना पालकांची अक्षरश: दमछाक होत आहे. कारण सेतू सुविधा केंद्रात अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित दाखला मिळण्यासाठी तब्बल महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याची पालकांची व्यथा आहे. जेव्हा पालक तपास करतात तेव्हा संबंधित कर्मचारी विविध बहाणे बनवतात, कधी नेट बंद आहे, तर कधी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडे पडून आहेत, असे सांगून पालकांना परतवून लावतात. त्यामुळे अक्षरश: वैताग आल्याची व्यथा पालकांनी बोलून दाखविली. कर्मचाऱ्यांच्या मनमानीबाबत पालकांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रारीदेखील केल्या आहेत. मात्र त्यांनीही त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. परिणामी सेतू केंद कर्मचाऱ्यांचेही फावत असल्याचा संतापही नागरिकांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)ताटकळत राहावे लागते उभे सेतू केंद्रात नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी शिकाऊ उमेदवार आहेत. त्यांना संगणकाचे सखोल ज्ञान नाही. परिणामी तेथे अक्षरश: सावळा गोंधळ सुरू असतो. पालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. विविध दाखल्यांसाठी सेतू सुविधा केंद्रात अर्ज दाखल केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांकडून १३ रुपयांची पावती दिली जाते. दिवसभरात शेकडो दाखले तयार करण्यासाठी येत असतात.
दाखल्यांसाठी ‘सेतू’त पायपीट
By admin | Updated: June 28, 2015 00:52 IST