भंडारा : पवनी नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदावर असताना जास्त अपसंपदा जमविल्याप्रकरणी दिनेश गजभिये रा.पवनी यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे.माहितीनुसार, २५ डिसेंबर २००६ ते ३१ डिसेंबर २०११ यादरम्यान दिनेश गजभिये यांनी स्वत:चे उत्पन्न, खर्च व मालमत्तेच्या टाळेबंदावरून त्यांच्याकडे ६९ लक्ष ८८ हजार ६६३ रूपयांची संपत्ती कमविली. गजभिये यांनी नगर परिषद पवनी येथे उपाध्यक्षपदावर काम करताना आपल्या पदाचा स्वत:च्या आर्थिक लाभाकरिता गैरवापर करून उत्पन्नाच्या तुलनेत ६९ लक्ष ८८ हजार ६६३ रूपये साडे चार पटीने जास्त एवढी अपसंपत्तीची मिळकत केली. या अपसंपदेत शेती, घर व नगदी रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे झाडाझर्ती सुरू होती. गजभिये यांच्या मालमत्तेबाबत अधिक माहिती घेणे सुरू असल्याचे विभागाचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत कोलवाडकर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. या कारवाईसाठी पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, हेमंत उपाध्याय, अशोक लुलेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे आदींनी कारवाईत भाग घेतला.(प्रतिनिधी)
माजी उपाध्यक्षाने अल्पावधीत कमविली लाखोंची अपसंपदा
By admin | Updated: October 1, 2014 23:17 IST