लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने दिलासा मिळत असला तरी एसटीच्या संपाने दहावी, बारावीत असलेले विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बसेस नसल्याने पालकांनाच आपल्या मुलांना केंद्रावर सोडून द्यावे लागणार आहे.भंडारा विभागातील एसटी कर्मचारी गत तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संपावर आहे. संप कधी मिटणार याची सर्वांना उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने काही कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर बसेस सुरू केल्या. परंतु त्या सर्व शहरी भागात आहे. आता ४ मार्चपासून बारावीची आणि १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. अनेक विद्यार्थी एसटी बसने परीक्षा केंद्रावर जातात. परंतु यावर्षी ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बसेसच उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना सोबतच घेवून दुचाकी अथवा खासगी वाहनाने जावे लागेल.
बारावीची परीक्षा ४ मार्च - जिल्ह्यात बारावीचे १६३ केंद्र असून येथे १७२ शाळातील १८ हजार १०७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने जैय्यत तयारी केली आहे.- कोरोना संसर्गाचे सावट असल्याने परीक्षा केंद्र संबंधित शाळांमध्येच देण्यात आले आहे. याठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी परीक्षेसाठी उत्सुक असून ऑफलाईन परीक्षा होणार आहे.
दहावीची परीक्षा १५ मार्च- जिल्ह्यात दहावीचे २६९ परीक्षा केंद्र तयार करण्यात आले. त्यात मुख्य केंद्र ८२ तर उपकेंद्र १८१ आहे. येथे २८८ शाळातील १७ हजार २० विद्यार्थी परीक्षा देतील.- दहावीची परीक्षा महत्वाची मानली जाते. मात्र कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यात आता एसटी बसचा संप असल्याने केंद्रापर्यंत पोहचण्याचे दिव्य विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पार पाडावे लागेल.
एसटीची संख्या किती वाढणार?जिल्ह्यात सध्या प्रमुख मार्गावर बससेवा सुरू आहे. संपकाळात १५२ कंत्राटी चालकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १०० चालकांची मंजुरी मध्यवर्ती कार्यालयाकडून मिळाली आहे. प्रमुख बसस्थानकांवर व गर्दीच्या ठिकाणी बुकींगसाठी कर्मचारी नियुक्तीबाबत ट्रॅयमॅक्स कंपनीला कळविण्यात आले आहे. मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच बसेसची संख्या वाढेल.