सिराज शेख
मोहाडी : तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतच असताना अधिकारी मात्र हातावर हात ठेवून बेफिकरीने वागत आहेत. कोरोनासंबंधी माहितीसाठी एखाद्याने संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला तर तिकडून प्रतिसाद मिळत नाही किंवा फोन नॉट रिचेबल दाखवितो. यावरून अधिकारी किती अलर्ट आहेत, हे समजून येते.
मुख्यमंत्री कोरोनाच्या स्थितीमुळे चिंतित व संवेदनशील आहेत. तर त्यांच्याच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी असंवेदनशील आहेत. नागरिक कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय ऐकत नाही, हे सर्वविदित आहे. मोहाडी तालुक्यातील दररोजचा चार, पाचचा आकडा आता १२४ वर जाऊन पोहोचला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील छोट्याशा गावातसुद्धा एके दिवशी १५ ते २५ कोरोना रुग्ण आढळत आहेत. ही चिंतेची बाब असतानासुद्धा दुकानात, बाजारात, कार्यक्रमात लोकांची नियमांना पायदळी तुडवत गर्दी करण्याची सवय गेलेली नाही. ते आपल्या सोबत दुसऱ्यांचा जीवसुद्धा धोक्यात घालत आहेत. यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याशिवाय नागरिक मानणार नाहीत.
परंतु नगरपंचायत, तालुका दंडाधिकारी व एक दोन अपवाद वगळता इतर ग्रामपंचायतीसुद्धा काही निर्बंध लावण्यात कुचराई करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध असतानासुद्धा मोहाडी शहरातले सर्व बिअर बार, काही हाॅटेल्स, पानटपरी रात्री १० ते ११ पर्यंत सुरू असतात. या बाबत एखाद्याने सूचना देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी अथवा रात्री संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला तर पलीकडून प्रतिसाद दिला जात नाही. यावरून अधिकारी किती गंभीर आहेत, हे लक्षात येते. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अलर्ट राहणे गरजेचे असून, कारवाईसुद्धा अपेक्षित आहे.