तुमसर : भंडारा गोंदिया जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून संपर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. या खरीप हंगामात सिंचनाकरिता पाणी दिल्याने केवळ २५ ते ३० टक्केच जलसाठा असल्याची माहिती आहे. अनेक वर्षापासून या तलावांचे खोलीकरण झाले नसून सर्वच तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याची धक्कादायक माहिती आहे. यात मामा तलाव, जिल्हा परिषद, राज्य जलसंपदा व गाव तलावांचा समावेश आहे. या जिल्ह्यात निलक्रांतीचे स्वप्न भंगण्याची शक्यता बळावली आहे.पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सुमारे १४ हजार तलावांची नोंद शासनदप्तरी आहे. कागदावर तलावांचे जलक्षेत्र मोठे असून प्रत्यक्षात आराजी जलक्षेत्र कमी आहे. जवळील शेतकऱ्यांनी या तलावावर अतिक्रमण केल्याची माहिती आहे. खीप हंगामात धानपिकाला बहुतेक सर्वच तलावातून पाणी देण्यात आले होते. त्यामुळे सध्या या तलावात केवळ २५ ते ३० टक्केच जलसाठा सध्या उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती आहे.भंडारा जिल्ह्यात रावणवाडी, चांदपूर, आंबागड, बघेडा, शिवणीबांध, सिरेगावबांध, पवनी तलाव, ढिवरवाडा, कोका जंगल, डोडमाझरी, जांभोरा, पालोरा, सिल्ली, खमारी, एकोडी, बांपेवाडा, बारव्हा, पालांदूर, मुरमाडी (हमेशा) तर गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध, कालपात्री, आमगाव, खळबंधा, पांगळी, इटियाडोह, कटंगी, भानपूर या मोठ्या तलावांचा त्यात समावेश आहे.मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील तलावाचे शासनदप्तरी जलसिंचन क्षेत्र २७ हेक्टर आहे. परंतु प्रत्यक्षात हा तलाव केवळ सध्या सात हेक्टरचा राहिला आहे. डोंगरगाव येथील मत्स्यपालन संस्थेनी येथे शासनाकडे तशी तक्रार केली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील तलाव शेवटची घटका मोजत असून या तलावांचे पुनरूज्जीवन करण्याकरिता खोलीकरणाची मागणी राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघाचे संचालक संजय केवट यांनी केली असून या संपूर्ण तलावांचे क्षेत्राचे शासनदप्तरी नोंद व प्रत्यक्षात जलसिंचन क्षेत्राची चौकीशीची मागणी केली आहे.निलक्रांतीचे स्वप्न भंगणारकेंद्र शासनाने मत्स्यपालन व मत्स्यव्यवसायातून रोजगार निर्मिती करीता हरितक्रांती सारखीच नीलक्रांती ही महत्वपूर्ण योजना हाती घेतली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्याला यामुळे अच्छे दिनाची आश होती. परंतु येथील तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात असून या तलावात पावसाळ्याखेरीज इतर मोसमात पाणीच राहत नसल्याने मत्स्यपालन कसे होईल हा मुख्य पश्न आहे.मासेमार समाज हा मुख्य प्रवाहापासून वंचित असलेला समाज आहे. या नीलक्रांतीमुळे त्यांची प्रगती निश्चित होण्याची हमी आहे. नीलक्रांती येण्याकरिता या दोन्ही जिल्ह्यातील तलावातील तलावांचे खोलीकरण, पाण्याचा योग्य वापर करण्याचे कडक नियम, मत्स्य व्यवसायास प्रोत्साहन व प्रशिक्षण येथे देण्याची गरज आहे. सिंचन प्रकल्प अपूर्ण असल्याने व शेतपिकाकरिता तलावातून पाणी सोडणे, पर्जन्यमान कमी होत असलयाने आता येथील शेती तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे. नीलक्रांती योजना यशस्वीपणे राबविण्याकरिता केंद्र सरकारची चमू भंडारा व गोंदिया जिल्ह्यात लवकरच येणार असल्याची माहिती आहे. ही चमू सद्यस्थितीत तलावांची स्थिती, जलसिंचन क्षेत्र, विस्तार, तलाव किती जुने आहे व उन्हाळ्यात या तलावात किती जलसाठा उपलब्ध राहतो याची चौकशाी करणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
तलावांना अतिक्रमणाचा विळखा
By admin | Updated: November 9, 2014 22:27 IST