तुमसर : तुमसर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीत कार्यरत सुमारे ४० ते ४५ रोजगार सेवकांना मागील दोन महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. अत्यल्प मानधनावर कार्यरत रोजगार सेवकांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे दिसते. शासनाच्या अनेक विकासात्मक कामात रोजगार सेवकांचा मोठा हातभार असतो. महात्मा गांधी तथा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना यशस्वी राबविण्यात यांचे मोठे योगदान आहे.शासनाचा निधी उपलब्ध असूनही या रोजगार सेवकांना दोन महिन्यापासून मानधन मिळाले नाही. ४० ते ४५ रोजगार सेवक तालुक्यात कार्यरत आहेत. एकूण कामाच्या सव्वा दोन टक्के त्यांना मानधनाची तरतुद शासनाने केली आहे. शासनाने कायमस्वरूपी त्यांना नियुक्ती दिली नाही, परंतु गावातच रोजगार प्राप्त होत असल्याने शिक्षित तरूण येथे रोजगार सेवकाचे कामे करतात.तुमसर पंचायत समितीकडून उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मानधन व प्रवास तथा दैनिक भत्त्यांचा प्रस्ताव सादर करावा लागतो. परंतु तसा प्रस्ताव सादर न केल्याने त्यांना मानधनाची प्रतिक्षा करावी लागत असल्याची माहिती आहे. या रोजगार सेवकांचा हक्काचा निधी प्राप्त असूनही केवळ नियोजनाच्या अभावी मानधनापासून मुकावे लागत आहे. दिवाळी सण केवळ एका आठवड्यावर आले असताना काय करावे या विवंचणेत येथील रोजगार सेवक आहेत. कामे जेवढी झाली तेवढा निधी रोजगार सेवकांना शासन देते. मानधन तुटपूंजे आहे. दिवाळी पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. येथे त्याचा विसर पडलेला दिसतो. (तालुका प्रतिनिधी)
रोजगार सेवक मानधनापासून वंचित
By admin | Updated: October 14, 2014 23:14 IST