जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम : जिल्हाधिकारी माधवी खोडे यांचे आवाहनभंडारा : जिल्ह्याचा, क्षेत्राचा आणि राज्याचा विकास होण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. आयुध निर्माणी जवाहरनगर या भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे या भागातील मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी आयुध निर्माणीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी येत्या १५ आॅक्टोंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.आयुध निर्माणी जवाहर नगर परिसरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आयुध निर्माणीचे अधिकारी व कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. खोडे बोलत होत्या. यावेळी आयुध निर्माणीचे व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंग, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, आयुध निर्माणीचे अधिकारी, तहसीलदार सुशांत बनसोडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाल्या, निवडणूक आयोगानेच जनतेमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच या निवडणुकीत पहिल्यांच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनतेने मतदान करण्याचे आवाहन येथे आहे. जवाहरनगर परिसरामधील मतदान केंद्र क्रमांक १७७ ते १८४ या केंद्रावर मतदान कमी होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या भागात मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आयुध निर्माणीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत ही बैठक आयोजित केली आहे. आयुध निर्माणीचे कर्मचारी सुशिक्षित आहेत त्यामुळे त्यांना आपल्या हक्काची जाणीव आहे. लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी आयुध निर्माणीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे मतदान दूत व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.भंडारा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी म्हणाले, मतदान करणे हा आपल्याला मिळालेला संवैधानिक अधिकारी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा जिल्हा महाराष्ट्रात मतदान टक्केवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. सर्व कर्मचाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांनी मतदान करावे
By admin | Updated: October 9, 2014 22:57 IST