पवनीत दसरा उत्सव : आखाडे, दांडपट्टा, लाठींचे चित्तथरारक कवायतीपवनी : ऐतिहासिक व प्राचीन पवनी नगरातील दसरा उत्सावासाठी पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील लोक उपस्थित राहिल्याने चंडिका माता मंदिर परिसरात दसरा पाहण्यासाठी जनसागर उसळला. दांडपपट्टा, लाठ्याकाठ्या, चित्तथरारक प्रसंग व आकर्षक झाकींनी बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.स्वातंत्र्यपूर्व काळापासून पवनी या ऐतिहासिक नगरात दसरा उत्सवाची परंपरा जोपासली जाते. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात नवरात्र उत्सवाचा समारोप दसरा उत्सवाने करण्यात येतो. परंपरेनुसार छत्रपती शिवाजी अखाडा, सार्वजनिक चंडीका अखाडा, या अली जूना आखाडा या अली नविन आखाडा, गमा वस्ताद जुना आखाडा, गमा वस्ताद नवीन आखाडा, जयदूर्गा आखाडा, जयहिंद नवीन आखाडा गराडापार (वाही), शिवाजी महाराज आखाडा, जयबजरंग आखाडा वाही या सर्व आखाड्यांच्या वस्तादांनी त्याच्या सहकाऱ्याकडून दांडपट्टा, लाठीकाठी, रोमहर्षक प्रात्यक्षिके, तंट्यामिल्ल अशा विविध प्रयोगाद्वारे पवनी नगरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणुकीने चंडिक, मंदीर परिसरात सादरीकरण केले. वैजेश्वर चौक, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक व आझाद चौक या चौकात प्रात्यक्षिक सादर करतात. गांधी चौकात विदर्भ पवनी ग्रुृपतर्फे आखाड्यांच्या सर्व वस्तादांचे शाल-श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावर्षी १९ झाक्यांनी सुंदर असे जिवंत देखावे मिरवणुकीत आणले होते.समारोपीय प्रसंगी नगराध्यक्ष रजनी मोटघरे, उपाध्यक्ष डॉ.विजय ठक्कर, माजी नगराध्यक्ष रघुनाथ विपरे, माजी उपाध्यक्ष रमा फुलबांधे, प्रकाश जायस्वाल, डॉ.अनिल धकाते, प्रा. श्रीकृष्ण शिवणकर, डॉ. विकास बावनकुळे, हाडगे गुरुजी, यादव वैरागडे, चंडिका माता पंच कमेटीचे अध्यक्ष राजू ठक्कर, उपाध्यक्ष केशव शिंदे, सचिव देवाजी बावनकर, सदस्य मोडकू लोखंडे, बंडू बावनकर, धनराज लंबाट, बाळकृष्ण कलत्री, लिलाधर मुंडले, नरेश बावनकर, विनायक मुंडले, खेमराज बावनकर व सतीश बावणकर यांचे हस्ते आखाड्यांच्या वस्तादांना व पुरस्कार प्राप्त झाकींना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.मिरवणुकीत डीजेचा वाढता प्रभाव अग्नीचे जीवघेणे प्रात्याक्षिक, मोटारसायकचे रोमहर्षक प्रयोग व टयूबलाईट रॉडचे प्रयोग भविष्यात धोकादायक व अपघताला कारणीभूत ठरु शकतात. त्यामुळे प्रशासनाने भविष्यात काळजी घेण्याची गरज बळावली आहे. (तालुका प्रतिनिधी)
दसरा उत्सवासाठी उसळला जनसागर
By admin | Updated: October 24, 2015 02:47 IST