भंडारा : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची अॅलर्जी असल्याचे दिसत असून त्यांच्या सततच्या अपडाऊनमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना खीळ बसली आहे.शासनाच्या नियमानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे अनिवार्य असताना शासनाच्या नियमाचे पालन न करता अनेक ग्रामसेवक अपडाऊन करीत आहेत. त्यांच्या अपडाऊनमुळे वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. याशिवाय गावातील अनेक विकासात्मक कामांना खीळ बसते, तसेच जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांचा विकास व्हावा यासाठी शासन विविध विकासात्मक योजना कार्यान्वित करून करोडो रूपये खर्च करते. मात्र प्रत्यक्ष यंत्रणेतील अंमलबजावणी काही कर्मचारी आपले कर्तव्य इमाने इतबारे न बजावता कामात कुचराई करीत असल्याने अनेक विकास कामे अपेक्षेनुसार होत नाहीत. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच विकासाच्या कामात टक्केवारी हे प्रकार अलीकडे जास्तच उदयास आल्याने विकास कामाचा दर्जा बेसुमार घसरतो. याशिवाय ग्रामस्थांना विविध कामासाठी दाखल्याची आवश्यकता असते. मात्र अनेकदा दाखला देण्यास विलंब होत असल्याने अनेकांना योजनेपासून वंचित राहण्याची पाळी येते. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरिता वेळेत दाखल्याची आवश्यकता असते. भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यास नॉट रिचेबल दाखविण्यात येते. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी जाब विचारल्यास पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या ठिकाणी बैठकी असल्याची वेळकाढू कारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. या ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवण्याचे काम पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांच्यावर असते. परंतु हे अधिकारी याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)
ग्रामसेवकांच्या अपडाऊनमुळे विकासकामांना खीळ
By admin | Updated: November 22, 2014 22:56 IST