लाखांदूर : आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत उचल केलेल्या धानाचा शासकीय नियमानुसार आवश्यक तांदूळ उतारा येत नसल्याने राईस मिलधारकांनी चक्क धानाची उचलच बंद केली. त्यामुळे धान भरडाई ठप्प असून, गोदाम हाऊसफुल्ल झालेले आहेत. वेळीच धानाची उचल झाली नाही, तर उन्हाळी हंगामातील धान खरेदी संकटात येण्याची भीती आहे.
गत खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यात जवळपास १९ आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत धानाची खरेदी करण्यात आली. या केंद्रात तीन सहकारी संस्थांतर्गत १४ केंद्रे, तर नवीन ५ केंद्रांचा समावेश आहे. तालुक्यात जवळपास पाच लाख क़्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धानाची वेळीच भरडाईसाठी उचल करणे आवश्यक होते. मात्र सुरुवातीला भरडाई दरावरून मिलधारकांचे असहकार आंदोलन आणि आता तांदूळ उताऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिलधारक धानाची उचल करत नसल्याने तालुक्यातील सर्वच धान गोदाम फुल्ल आहेत. कही ठिकाणी धान उघड्यावर ठेवण्यात आला आहे.
गत महिन्यात शासनाने या केंद्रांतर्गत आदेश निर्गमित केल्याने राईस मिलधारकांनी धानाची उचल केल्याची माहिती आहे. मात्र उचल केलेल्या धानाची भरडाई केली असता, शासन परताव्याअंतर्गत आवश्यक तांदूळ उतारा येत नसल्याने राईस मिलधारकांनी धानाची उचल बंद केली आहे. तालुक्यात पुरपरिस्थिती, कीडरोग आदींचा धान पिकावर प्रचंड प्रादुर्भाव झाल्याने साहजिकच उताऱ्यासह भरडाईत देखील घट येत आहे. मिलधारकांना भरडाई व तांदूळ परतावा परवडत नसल्याने धान खरेदी मुदत होऊनदेखील धानाची उचल झाली नाही.
बॉक्स
धान कोंड्याअभावी वीट व्यवसाय संकटात
आधारभूत केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या धानाची उचल व भरडाई केली जात नसल्याने तालुक्यातील सर्वच राईस मिलमध्ये कोंड्याचा तुटवडा दिसत आहे. अशातच कोंड्याविना वीटभट्टीत उपयोगी इंधन उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील वीटभट्टी व्यवसाय संकटात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासोबतच राईस मिलमधील मजुरांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वेळीच उचल झाली नाही, तर आगामी उन्हाळी खरेदीही प्रभावित होऊ शकते.