भंडारा : यंदाच्या दिवाळीवर महागाईमुळे संक्रांत ओढवली आहे. जवळपास सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्यांना दिवाळी साजरी करणे कठीण झाले आहे.दरवर्षी सर्वच आनंदाने आणि उत्साहाने दिवाळीची वाट बघतात. दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा या म्हणीप्रमाणे आबालवृद्ध दिवाळं सणाची आतुरतेने वाट बघतात. दिवाळीत नवीन कापड खरेदी करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. दिवाळीनिमित्त घरात नवीन वस्तू घेण्याचीही क्रेझ अलीकडच्या काळात वाढली आहे. त्यामुळे या सणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी सर्वच दिवाळी येण्याची वर्षभर वाट पाहतात. मात्र यावर्षी महागाईने दिवाळीवरच संक्रांत आली आहे. दररोज वाढणारे भाव बघता दिवाळी सण कसा साजरा करावा या विवंचनेत सामान्य जनता दिसत आहे.दिवाळीत बच्चे कंपनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करते. यानिमित्त मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची खरेदी होते. मात्र यावर्षी फटाक्यांच्या किमती जवळपास २५ ते ३० टक्के वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे फटाके खरेदीवर बंधने येण्याचीही शक्यता आहे. लहान मुले केवळ शोभेच्या फटाक्यांकडे आकर्षित होतात. आवाजाचे फटाके घेण्याचा कल आता कमी झाला आहे. मोठे मात्र आवाजाच्या फटाक्यांकडे अजूनही आकर्षित होतात. तथापि वाढलेल्या किमतीने फटाक्यांची खरेदी खिसा बघूनच करावी लागणार आहे.फटाक्यांशिवाय दिवाळीत मोठ्या प्रमाणात कापडांची खरेदी केली जाते. मात्र कापडाच्या किंमतीही सतत वाढत आहेत. परिणामी कापड खरेदीवरही बंधने येण्याची शक्यता आहे. आपली मिळकत बघूनच प्रत्येक जण कापड खरेदी करणार आहेत. विशेषत: लहान मुलांचा हिरमोड होऊ नये म्हणून पालकांना प्रथम त्यांच्या कापडांची तजवीज करावी लागणार आहे. त्यानंतर उरलेल्या पैशातून घरातील जाणती माणसे कापड खरेदी करणार आहेत. दिवाळी सणात घरात गोडधोड पदार्थ करण्याची चढाओढ गृहिणींमध्ये लागलेली असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सणासाठी किराणा जिन्नसांची खरेदी केली जाते. किराणा मालाच्या किमतीही सतत वाढतच असल्याने मात्र किराणा मालाच्या किमतीही सतत वाढतच असल्याने मात्र किराणा खरेदी करणेही कठीण होऊन बसले आहे. तरीही आवश्यक तेवढा किराणा खरेदी करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे निवडणूक आटोपताच शहरातील किराणा दुकानांमध्ये गर्दी होणार आहे. एकवेळ कापड खरेदी केले नाही तरी चालेल, पण किराणा खरेदी आवश्यक आहे.कापड, फटाके, किराणा सोबतच इतर पदार्थाची खरेदीही करावी लागणार आहे. मात्र या खरेदीला महागाईने लगाम लावला आहे. ऐपत पाहूनच सर्वांना खरेदी करावी लागणार आहे. या महागाईने आॅक्टोबरमधील दिवाळीवर जानेवारीतील संक्रांतीने आत्ताच संक्रांत आणल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लक्ष्मीपूजनाला सोने खरेदी करण्याकडेही अनेकांचा कल असतो. मात्र सोन्याचे भावही दरदिवसाला वाढत आहे. सध्या २७ हजारांच्यावर प्रती तोळा असलेले सोने पुन्हा वाढण्याचे संकेत सराफा व्यावसायीकाकडून मिळाले आहेत. त्यामुळे यावर्षी सोने खरेदीलाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तथापि सुखवस्तू कुटूंबे नक्कीच सोने खरेदी करतील. मात्र सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. (शहर प्रतिनिधी)
महागाईमुळे दिवाळीवर संक्रांत
By admin | Updated: October 22, 2014 23:13 IST