पावसाअभावी शेतकरी संकटात : ६३ प्रकल्पांत ३७ टक्के जलसाठा देवानंद नंदेश्वर भंडाराबळीराजाला वर्षभर शेतात सोबत करणाऱ्या बैलांच्या उपकाराचे देणे फेडणारा सण म्हणजे पोळा. पण मागील अनेक दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ९३ दिवसात केवळ ६७ टक्के पाऊस बरसला. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात केवळ ३७ टक्के जलसाठा असून सिंचनासाठी मारक ठरत आहे. त्यामुळे गत तीन वर्षांप्रमाणे यावर्षीदेखील जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया आहे.मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यत दुष्काळसदृश स्थिती होती. यंदा परिस्थिती बदलणार, अशी आशा होती. हवामान खात्यांचा अंदाज आणि सुरुवातीची दमदार पावल्यांनी एन्ट्री केल्याने पुढचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे होती. हा उत्साह पोळ्यानिमित्ताने दिसून येणार होता. पण पाऊस गायब झाला. धान पिकाला ऐन उमेदीच्या काळातच पाणी मिळाले नाही. अशातच २४ तासांपैकी ९ तास वीज मिळत असल्याने सिंचन सोय असलेले शेतकरीही या संकटापासून दूर नाहीत. याचा एकूणच परिणाम पोळ्याच्या बाजारपेठेवर दिसून येत आला. वाढत्या मजुऱ्या आणि ट्रॅक्टरच्या सोयीमुळे अलिकडे बैलजोड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शंभरावर बैलजोड्या असलेल्या गावांमध्ये आता ही संख्या २५ वर येऊन ठेपली आहे. संख्याच कमी झाल्याने खरेदीही घटल्याचे सांगण्यात येत आहे.६३ प्रकल्पातील पाणीसाठ्यात केवळ ३७.६५ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ३७.६५ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठ्यात १४ टक्के घट झालेली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात बेटेकर बोथली प्रकल्पात १६ टक्के, चांदपूर मध्यम प्रकल्पात ३५, बघेडा ३०, सोरणा जलाशयात उपयुक्त जलसाठा ३० टक्के आहे़जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ३६.९८ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ४७.४ टक्के आहे़ एकूण ६३ प्रकल्पात केवळ ४५.७९६ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी ०१ सप्टेंबर २०१५ रोजी ६३ प्रकल्पात ६१.४०८ आणि ०१ सप्टेंबर २०१४ रोजी ७२.४५९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे.
जिल्ह्यात दुष्काळाचे सावट
By admin | Updated: September 2, 2016 00:29 IST