२४ रुग्णावर उपचार : उपजिल्हा रुग्णालयात १२ रुग्ण दाखल तुमसर : तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे अतिसाराचा प्रकोप वाढत असून तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरूवारी १२ रूग्ण दाखल करण्यात आले. याशिवाय तुमसर शहरासह इतर गावातील १२ रूग्णावर उपचार सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांची संख्या वाढल्याने काही रूग्णांना जमिनीवर खाली अंथरून टाकून ठेवण्यात आले आहे. तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील नेहरू, सुभाष वॉर्डात अतिसाराची लागण झाली आहे. येथे एका विहीरीचे पाणी दूषित झाले ते पाणी पिण्यासाठी नागरिकांनी उपयोगात आणले. या पाण्यामुळे अतिसाराची लागण झाली. तिसऱ्या दिवशी देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्योती राजुके, मुन्नी श्रीवास यांना अतिसाराची लागण झाली. त्यांना उपचाराकरिता देव्हाडी येथे दाखल करण्यात आले. तुमसर येथील उपजिल्हा रूग्णालयात देव्हाडी येथील १२ रूग्ण दाखल करण्यात आले. यात कृष्णा मोहतुरे (२०), नितेश कोकुडे (२६), भारती मेश्राम (१७), यशोदा श्रीवास (४६), वच्छला वहिले (५०), रोहित तुमसरे (१०), नेहा कावळे (३६), भाविका चामलाटे (२६), रंजना मते (३०), गौरीशंकर कडव (२६), सरीता मेश्राम (१८), केसरीबाई श्रीवास (६०) यांचा समावेश आहे. याशिवाय रोहित कोकडुे (१३) आसलपानी, दीपक नागरीकर (१९) डोंगरला, राधेश्याम सोनवाने (४८) सोंड्या, माही बावणकर (४) तुमसर, वैशाली इंगोले (३३) कोष्टी, दुर्गा दिघारे (२५) तुमसर, देवचंद बनकर (५०) बोरी, सचिन रामटेके (४०) तुमसर, विश्रांती मासूरकर (१०) तुमसर, कमलाबाई पंधरे (५४) तुमसर, चंदेश ढोले (३४) तुमसर, अर्नवी पंचबुद्धे (१९) कोष्टी यांचा समावेश आहे. काही महिला पुरूष रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याने खाली अंथरून टाकून उपचार केले जात आहे. पावसाळ्यात खाली अंथरून घालून उपचार करणे धोकादायक आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डोईभोडे यांनी बुधवारी देव्हाडी येथे नेहरू सुभाष वॉर्ड परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी, उपजिल्हा रूग्णालयात भेट देवून पाहणी केली. पाण्याचे नमुने तपासणीकरिता घेण्यात आले. सुभाष वॉर्डात एका विहरीजवळ शौचालय बांधण्यात आले. शौचालयामुळेच विहीरीचे पाणी दूषित झाले असा वॉर्डवासीयांचा आरोप आहे. दरम्यान देव्हाडी ग्रामपंचायतीने बुधवारी विहीरतील पाण्याचा उपसा केला परंतु विहीरीत पुन्हा दूषित पाणी येणे सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
अतिसाराच्या रुग्णांत वाढ
By admin | Updated: July 22, 2016 00:48 IST