गोपालक त्रस्त : एका गाईचा मृत्यूपवनी/पालोरा : तालुक्यात गावोगावी पाळीव जनावरांना तोंडखुरी व पायखुरीने ग्रासले आहे. यामुळे पशुपालकांना चिंता भेडसावत आहे. यात पिंपळगाव निपाणी येथे ७५ टक्के जनावरामध्ये या रोगाची लागण झाल्याची माहिती आहे. येथील पशुपालक रविंद्र तलमले यांची ३० हजार रूपयाची गाय दगावली. याकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते.कोंढा पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत १८ गावांचा समावेश आहे. अनेक गावांमध्ये जनावरांना तोंडखुरी व पायखुरीची लागण आहे. शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत लसीकरण सुरू आल्याचे सांगत जात आहे. मात्र परिस्थिती वेगळीच आहे. हा भाग चौरास भाग असल्यामुळे येथे बाराही महिने जनावरांचे वैरण उपलब्ध असते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात दुध-दुभते जनावरे आहेत. दररोज लक्षावधी लिटर दुधाचे उत्पादन होते. जनावरांना तोंडखुरी व पायखुरीची लागण झाली आहे. पशुपालक घरगुती उपचार करीत आहेत. या रोगामुळे जनावरांना चालता येत नाही. चारा खाता येत नाही. जनावरे वैरण खात नसल्यामुळे अशक्त झाली आहेत. याचा परिणाम दुध उत्पादनावर होत आहे. याच बरोबर शेतावर बैलाअभांवी काम रखडले आहेत. या रोगाबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून साधी पाहणी सुद्धा केली जात नाही. पिंपळगाव निपानी येथे जवळपास ३ हजार पाळीव जनावरे आहेत. घरोघरच्या जनावरांमध्ये या रोगांची लागण झाली आहे.पालोरा : कोंढा येथील पशु दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे गोपालांना बोगस डॉक्टराकडून उपचार करून घ्यावे लागत आहे. पिंपळगाव येथे प्रतिनिधीने भेट दिली असता त्यांनी सांगितले की, मागील महिन्यात येथे या रोगावर प्रतिबंधक लस लावण्याचे शिबिर घेण्यात आले होते. मात्र अर्धा जनावरांना लस लावण्यात आली होती. औषधी संपली म्हणून शिबिर बंध करण्यात आला होता. मात्र जनावरांना कोणताच फायदा झाला नाही. येथील पशुपालक जनार्धन मरगवे यांनी सांगितले की, आपल्या गावापासून पशुदवाखाना लांब असल्यामुळे उपचाराकरीता जनावर नेने शक्य होत नाही. कोंढा येथील दवाखान्यात औषधी आणण्याकरीता गेलो असता येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष रेहपाडे यांनी मुदत संपलेली औषध दिली. ही बाब त्यांना निर्देशनात आणून दिली असता काही होत नाही म्हणून परत पाठविले. मात्र ती औषधी जनावरांना दिली नाही. जनावरांना तोंडखुरी व पायखुरी रोगाने ग्रासले आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना एखादा दुसरा जनावर दगावल्यावर जाग येईल का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. दवाखाने जिल्हा परिषद अंतर्गत चालविली जातात. मात्र येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने पशुधन धोक्यात आले आहे. तालुक्यातील पालोरा, बाम्हणी, लोणारा, मासळ अशा अनेक गावातील जनावरांमध्ये या रोगाची लागत सुरू आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी मुग गिळून आहेत. संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून त्वरीत शिबिर लावण्यात यावे, अशी मागणी रविंद्र गाडेकर, निवृत्त येळणे, सुभाष गाडेकर, शामराव गाडेकर आदी गोपालकांनी केली आहे. (वार्ताहर)
रोगाची लागण, जनावरांच्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह
By admin | Updated: December 9, 2015 00:53 IST