जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणीभंडारा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात व राज्य घटनेने दिलेल्या हक्काची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.घटनेच्या अनुसूचीप्रमाणे धनगर ही जमात ३६ व्या क्रमांकावर असताना राज्य शासनाने धनगर समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवले, धनगर, धनगड ही एकच जमात असून केवळ इंग्रजी लिपीतील ड आणि र या भाषा भेदामुळे राज्य शासनाने मागील ६५ वर्षापासून धनगर समाजाला न्याय हक्कापासून वंचित ठेवले. छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक, ओरीसा, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश या राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत आहेत. राज्य शासनातील आदिवासी विकास मंत्र्याच्या विरोधामुळे न्याय हक्कापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप या समितीने केला आहे.दसरा मैदानातून निघालेला हा मोर्चा त्रिमूर्ती चौकात आला. मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांना मागण्याचे निवेदन दिले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, उपाध्यक्ष प्रकाश हातेल, सचिव शंकर गायकी, पंडितराव पांडे, गीता कोंडेवार, विद्या पांडे, विजया चाफले, किसन थाटकर, नितीन चावटकर, तुळशीदास खऊळ, शामलाल खऊळ, खुशाल घटारे, मारोती गोमासे, योगिराज मुकूर्णे, उत्तम कुंभारगावे, जयशंकर घटारे, विजय मुकूर्णे, अमित कोंडेवार, जीवन घटारे, निकेश पडोळे, अमोल कुरूडकर, शालिक अहिर, महेद्र घटारे, वसंत थाटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
धनगर समाजाचा मोर्चा
By admin | Updated: August 11, 2014 23:43 IST