भंडारा : किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यातील धान खरेदीसाठी ३0 सप्टेंबर २0१४ पर्यंत मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून तशी पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आहे.किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत २0१३-१४ च्या धान खरेदीसाठी केंद्र शासनाने फेब्रुवारी २0१४ पर्यंत मुदत दिली होती. त्या अनुषंगाने मध्य प्रदेश राज्याने २५ जानेवारी २0१४ पासून तर छत्तीसगड राज्याने १५ फेब्रुवारी २0१४ पासून धान खरेदी बंद केलेली आहे. मात्र आपल्या राज्यातील धान उत्पादक विशेषत: विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर होणार्या उन्हाळी धान उत्पादनाचा विचार करून राज्य शासनाने १५ मे २0१४ पर्यंत धान खरेदी सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते.धान खरेदीची मुदत संपल्यामुळे या भागातील धान खरेदी थांबली आहे. यापूर्वी संपूर्ण पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत सन २0१0-११ ते सन २0१२-१३ या तीन वर्षात धान खरेदी केंद्र शासनाच्या परवानगीने दर वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहत होती. तथापि आता केंद्रामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार नुकतेच स्थापन झाले असल्याने धान खरेदीच्या मुदतवाढीसाठी त्यांची मान्यता घेणे आवश्यक आहे. यास्तव शेतकर्यांची आग्रही मागणी विचारात घेवून पूर्वी प्रमाणे म्हणजेच ३0 सप्टेंबर २0१४ पर्यंत यावर्षी धान खरेदीस मुदतवाढ देण्याची विनंती नवनिर्वाचित केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे करण्यात आली आहे. हिरवी झेंडी मिळताच धान खरेदी सुरू करण्यात येण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
धान : मुदतवाढीसाठी केंद्राकडे धाव
By admin | Updated: June 4, 2014 23:29 IST