लोकमत शुभवर्तमान : भंडारा जिल्ह्यातील पहिला प्रयोग निमगावातपहेला : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या विद्यमाने भंडारा तालुक्यातील निमगाव येथे डॉ. संजय एकापुरे यांचे शेतामध्ये ५० गुंठे क्षेत्रावर सगुना राईस तंत्रज्ञानाद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक करण्यात आले. सगुना पद्धत अवलंबविण्याचे पहिले प्रात्यक्षिक निमगाव येथे करण्यात आले. दिवसेंदिवस भात लागवडीसाठी वाढीव खर्च आणि होणारे उत्पन्न यांचा विचार करता, सगुना राईस तंत्र हे भात शेतीशी संबंधित नांगरणी, चिखलणी व भात लावणी न करता कायमस्वरूपी गादीवाफ्यावर टोकनी करून भरघोस भात पिकविण्याचे नवे तंत्र आहे. या पद्धतीत भात पिकानंतर त्याच गादीवाफ्यावर भाजीपाला लागवड करता येऊ शकते. त्यात वाल, कांदा, कोबी, भेंडी, हरभरा, मका, गहू आदी पिके घेता येतात. त्यानंतर उन्हाळ्यात त्याच गादीवाफ्यावर वैशाखी मुंग, भुईमुंग, सुर्यफुल, सोयाबीन अशी फेरपालट पिके घेऊ शकतो. ही पद्धत सगुना नाग नेरळ जिल्हा रायगड येथील चंद्रशेखर भडसावळे यांनी विकसीत केलेली आहे. या पद्धतीत एक मीटर रूंदीचा गादीवाफा तयार करून गादीवाफ्यावर छीद्र पाडण्यासाठी साचा वापरून त्यावर १०० बाय ७५ से.मी. क्षेत्र तसेच रोपांमधील अंतर २५ बाय २५ से.मी. लागवड करायचे असते व प्रत्येक छीद्रात २ किंवा ३ दाणे टाकावे त्यामुळे बियाणाची सुद्धा बचत होते. त्यासाठी एका हेक्टरला फक्त ८ किलो बियाणे लागतात.या सर्व बाबीचा विचार करता सगुना राईस पद्धतीमुळे शेतकऱ्यांना वेळेची बचत, खर्चाची बचत आणि भरघोस उत्पन्न मिळते व त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते. या पद्धतीचा अवलंब कोकणामध्ये अनेक गावात सगुना राईस तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या पद्धतीत एकदा गादीवाफे तयार केल्यावर त्याच वाफ्यावर तीन वर्षे उत्पन्न घेता येते. निमगाव येथील डॉ. संजय एकापुरे यांचे शेतावर प्रात्यक्षिक करतेवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर, उपविभागीय कृषी अधिकारी सिद्धार्थ लोखंडे, प्रकल्प उपसंचालक पुनम खटावकर, पहेलाचे मंडळ कृषी अधिकारी सुरेश गणवीर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी सहायक गणेश चेटुले, कृषी सहायक सुभाष केदार, पोलीस पाटील अंबादास चवळे, माजी सरपंच देवचंद शिडाम उपस्थित होते. (वार्ताहर)
‘सगुना’ने साधला भात शेतीचा विकास
By admin | Updated: July 17, 2016 00:22 IST