खरबी नाका येथील प्रकार : शेतकरी संकटात, नुकसानभरपाईची मागणीखरबी नाका : खरबी नाका येथून १ कि.मी. अंतरावर असलेल्या साईनाथ अॅग्रो प्रकल्पामधील धुळ व गरम राख शेतामध्ये शिरत असल्याने शेतपिकांची नासाडी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्याने कंपनी व्यवस्थापनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली आहे.राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या खरबी लगत खराशी गावातील शेतकरी कोंडबा हिवसे यांच्या मालकीची ३.६१ हेक्टर जमीन आहे. या जमिनीमध्ये मागील बराच वर्षापासून धान, हिरवी मिरची, गहू, हरभरा, भाजीपाला इत्यादी पिके घेतली जातात. आतापर्यंत चांगल्या प्रकारे येत असलेली शेतपिके मागील दीड वर्षापासून अडचणीत आले आहेत. कंपनीच्या आवारभिंतीला लागून असलेल्या शेतपिकांवर साईनाथ अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये धानावर प्रक्रिया करून तांदुळ तयार करण्यात येतो. या प्रकल्पामध्ये धान इकत्तीन तांदूळ निर्मिती करण्यासाठी विजेचा उपयोग केला जातो. जळालेल्या धानाच्या कोंड्याची राख व बाहेर पडणारी धुळ ही लगतच्या शेतामध्ये पिकांवर जाऊन पडत असल्याने पिकांची नासाडी होत आहे. गरम राखेमुळे शेतातील पिके करपत आहे. खरीप हंगामात सोयाबीन धान व इतर पिकाचे नुकसान झालेले आहे. सध्या शेतामध्ये हरभरा व गव्हाचे असून पीक पूर्णपणे काळे पडले आहे. हरभऱ्याला बार न आल्याने उत्पादन न होण्याची चिंता निर्माण झाली आहे. मागील दीड वर्षापासून हा त्रास शेतकऱ्याला सहन करीत आहे. आतापर्यंत २० लाख रुपयाचे नुकसान सहन करावे लागल्याची खंत शेतकऱ्यांचा मुलगा हरिचंद्र कोंडबा हिवसे यांनी बोलून दाखविली.आमदार रामचंद्र अवसरे यांनी शेतपिकाची पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले. परंतु कोणत्याच प्रकारचे कारवाई होताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची वेळ आली आहे. या प्रकाराची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही शेतकऱ्याने केली आहे. या विभागाने शेतपिकाची कोणतीही पाहणी न करता कंपनीला भेट दिल्याचे शेतकऱ्याने बोलून दाखविले. लाखो रुपयाचे उत्पादन देणारी शेती १५ जणांच्या कुटुंबाचे पालनपोषण करीत होती. मात्र उत्पादन येणे बंद झाल्याने कुटुंबावर आर्थिक नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
धूळ, गरम राखेमुळे शेतपिकांची नासाडी
By admin | Updated: January 24, 2016 00:46 IST