अनुदान वाटपविषयी वनविभाग संभ्रमातदेवानंद नंदेश्वर - भंडारानैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीनतेत फसलेल्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. जानेवारी २०१५ अखेरपर्यत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात शेतपिक, पशुधन, मानव हानी, जखमी झालेल्या ६०४ जणांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा कायम आहे. ६०४ जणांना अनुदान वाटपासाठी ४४ लाख रुपयांची गरज असताना केवळ १३ लाख ६८ हजारांचा अनुदान वनविभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे अनुदान वाटपविषयी वनविभागात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.जिल्ह्यात सातही तालुक्यात जंगलाचा काही भाग येत आहे. या जंगलातील श्वापदे अन्नाच्या शोधात येत लगतच्या शेतात धुडगूस घालतात. या श्वापदांकडून शेतातील कोणत्याही एका भागातील पिकाचे नुकसान होते. नुकसान करून पळून जाताना ही श्वापदे शेतातील पिकच तुडवत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात या श्वापदांनी एकूण १,५२० शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त केले. याची पाहणी वनविभागाच्यावतीने करण्यात आली असून ९७० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ५५० शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना ३४ लाख रुपयांच्या अनुदानाची गरज आहे. या वन्य प्राण्यांनी केवळ शेतीचेच नाही तर शेतकऱ्यांच्या पशुधनावरही हल्ला चढविला आहे. त्यांनी जिल्ह्यात डिसेंबर २०१४ पर्यंत एकूण १११ जनावराची हानी झाली. तर ६२ व्यक्तींवर हल्ला केला आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकरणात वनविभागाच्यावतीने मदत देण्यात येत असली तरी या मदतीकरिता वनविभागाच्या कार्यालयात चकरा मारणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अशात कधी नियमाची आडकाठी तर कधी अनुदान नसल्याचा रोडा असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात केवळ १३ लाख ६८ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर मदत वाटप करताना वनविभाग अधिकाऱ्यांना संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यावर शासनाच्यावतीेने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
मागितले ४४ लाख, मिळाले १३.६८ लाख
By admin | Updated: February 4, 2015 23:08 IST