वरठी : वरठी-पांढराबोडी रस्ता अतिक्रमणामुळे बंद करण्यात आला. सदर रस्ता बंद झाल्यामुळे वरठी, सिरसी व पांढराबोडी येथील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व गावकऱ्यांना त्रास होत आहे. यासंदर्भात अनेकदा मौका चौकशी झाली. पण रस्ता खुला करण्यात आला नाही. रस्ता बंद झाल्यामुळे जनतेची अडचण होत आहे. अधिकाऱ्यांना गावात न येवू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सदर रस्ता भंडारा-मोहाडी तालुक्याच्या सिमेवर येतो. जिल्हा मार्ग म्हणून या रस्त्याची शासकीय दफ्तरी नोंद आहे. भंडारा शहराला जाण्याकरीता 'शार्टकट' रस्ता असून वरठी मार्गे पांढराबोेडी येथे जाण्याकरीता एकमेव मार्ग आहे. या रस्त्याच्या उपयोग वरठी, पांढराबोडी व सिरसी येथील शेतकरी व विद्यार्थ्यांना होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वरठी व सिरसी गावाची हद्दीत आहे. सनफ्लॅग कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या वसाहती व सनफ्लॅग स्कूलला जाण्यासाठी हा सरळ रस्ता आहे. सदर रस्ता वरठी येथून जाणाऱ्या राज्य महामार्ग ३५५ ला जोडतो. वरठी-भंडारा या मार्गावर असलेली वाहनांच्या वर्दळीमुळे शेकडो दुचाकीस्वार या मार्गाचा वापर करून भंडारा येथे जातात. वरठी ते पांढराबोडी हे ५ कि़मी. चे अंतर आहे. पांढराबोडी पासून ते वरठीपर्यंत सदर रस्ता मोकळा असून वरठी येथील जगनाडे चौकातील टी-पार्इंटजवळ रस्ता अडकवण्यात आला आहे. एकंदरीत १०-२० फुट रस्ता अगदी टोकावर अडवल्यामुळे रस्ता पूर्णत: बंद झाला आहे. सदर रस्त्यावर तीनवेळा खडीकरण करून डांबरीकरण करण्यात आले आहे. भंडारा व मोहाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालया मार्फत २०११ मध्ये मोजमाप झाले. जिल्हा परीषद भंडाराच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम पाडले होते. तीन वर्षानंतर पुन्हा अतिक्रमणामुळे रस्ता बंद झाल्यामुळे लोकांच्या मनात संताप व्यक्त होत आहे. येथील नागरीकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वार्ताहर)
अतिक्रमण हटविण्याची मागणी
By admin | Updated: October 11, 2014 22:59 IST